सांडपाण्याच्या पाइपलाइनचे काम रोखले

By Admin | Updated: February 28, 2016 04:05 IST2016-02-28T04:05:58+5:302016-02-28T04:05:58+5:30

तारापूर औद्योगिक वसाहतीमधून निघणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर पुरेशी प्रक्रिया न करताच ते पाणी समुद्रात सोडून खाड़ी खाजणातील सर्व मासे संपुष्टात आणले आहेत.

Stopping the piped pipeline work | सांडपाण्याच्या पाइपलाइनचे काम रोखले

सांडपाण्याच्या पाइपलाइनचे काम रोखले

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधून निघणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर पुरेशी प्रक्रिया न करताच ते पाणी समुद्रात सोडून खाड़ी खाजणातील सर्व मासे संपुष्टात आणले आहेत. आता थेट समुद्रात ७.१ किमी दूरवर प्रदूषित सांडपाणी सोडण्यात येऊन मासेमरिचा गोल्डन बेल्ट नष्ट करण्याचा कुटिल डाव एमआयडीसी, एम्पीसीबीकडून आखला जात असल्याच्या निषेधार्थ आज दांडी, आलेवाड़ी, नवापुर इ. भागातील शेकडो मच्छीमार महिला-पुरूषांनी एकजूट दाखवित पाईपलाईन चे काम बंद पाडले.
तारापुर औद्योगिक वसाहती मधील कारखान्या मधून दर रोज सुमारे ७० ते ७५ दशलक्ष लीटर प्रदूषित सांडपाण्याची निर्मिती होत असून त्या पैकी फक्त २५ ते ३० दशलक्ष लीटर प्रदूषित पाण्यावर एम्पीसीबीच्या सांडपाणी केंद्रातून प्रक्रिया केली जाते. जास्त क्षमतेच्या प्रक्रिया केंद्राची उभारणीचे काम सुरु असल्याने उर्वरित ४० ते ४५ दशलक्ष लीटर प्रदूषित पाण्याची विल्हेवट खाड़ी, खाजणे, समुद्र, खुली गटारे इ. द्वारे केली जात असल्याने दांडी, नवापुर, आलेवाड़ी, मुरबे, सातपाटी, वडराई, इ.भागातील खाडयाचे पाणी काळे पिवळे पडून मासे, शिंपले इ. मत्स्य संपदा जवळपास नष्ट झाली आहे. या विरोधात अनेक निवेदन, मोर्चे आंदोलने काढूनही काही कंपन्यावर प्रदूषण मंडळाकडून थातुरमातुर कारवाई केली जाते होती. कडक कारवाई केल्यास कंपन्या बंद पडून रोजगार बंद पडेल अशी भीति स्थानिकांना कंपन्यांच्या हितचिंतकांकडून दाखविली जात आहे.
नावपूरच्या समुद्र किनारी ११० कोटी रुपयांच्या योजने अंतर्गत १ हजार मिलीमीटर व्यासाचे एचडीपीई पाइप एकमेकांना जोडून समुद्रात नेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असताना महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती,अखिल मांगेला समाज परिषद्, पोफरण दांडी मच्छीमार सहकारी संस्था, इ.संघटनांनी या पाइपलाइन टाकण्याास विरोध दर्शविला होता. तरीही याची कुठलीही गंभीर दखल न घेता या कामाचा ठेका घेणाऱ्या एस एमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपले काम सुरूच ठेवले होते. त्या मुळे काम थांबविण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी, एमआयडीसी, प्रदुषण मंडळ यांच्याशी प्रथम चर्चा करा त्या नंतरच कामाला सुरुवात करा. असे कळवले असताना जोपर्यंत पर्यायी मार्ग निघत नाही तो पर्यंत ठेकेदाराने काम सुरु करू नये असे पत्र पोफरण संस्था अध्यक्ष विजय तामोरे, जी. प. सदस्य तुळसीदास तामोरे, सेनेचे सुधीर तामोरे, भावेश तामोरे इ. नी दिले. या पत्रावर नवापूर ग्राम पंचायतीचे सदस्य संतोष पागधरे, खगेश पागधरे, इ. सह रोहित बारी, विजय बारी इ. नी आक्षेप घेतला. याच पाइपलाइन संदर्भात टीमा मध्ये जनसुनवाई झाली असताना आम्हाला कुणीही पाठिंबा दर्शवल नाही. आम्हाला मिळणारा ४० लाख रुपयांचा टॅक्स आता सर्वांच्या डोळ्यावर येत असल्याच्या प्रतिक्रिया त्यानी व्यक्त करुन गावातील पाइपलाइनचे काम आम्ही बंद करू देणार नाही असा पवित्रा नवापुर मधील काही निवडक मंडळींनी घेतल्या नंतर दोन गटात बाचाबाची झाली. (वार्ताहर)

Web Title: Stopping the piped pipeline work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.