भार्इंदरच्या एलआयसी कार्यालयात चोरीचा प्रयत्न
By Admin | Updated: January 7, 2016 00:22 IST2016-01-07T00:22:42+5:302016-01-07T00:22:42+5:30
पूर्वेकडील छत्रपती शिवाजी मार्गावर असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) शाखा क्र. ९२एल मध्ये शनिवारी (२ जानेवारी) रोजी चोरीचा

भार्इंदरच्या एलआयसी कार्यालयात चोरीचा प्रयत्न
भार्इंदर : पूर्वेकडील छत्रपती शिवाजी मार्गावर असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) शाखा क्र. ९२एल मध्ये शनिवारी (२ जानेवारी) रोजी चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचे उजेडात आले आहे. गतवर्षीही याच शाखेतून सुमारे सव्वादोन लाखांची रोकड लंपास करण्यात आली होती.
एलआयसीने आठ वर्षांपूर्वी भार्इंदर पूर्वेकडील जेसल पार्क येथील शाखा बंद करुन ती मीरा-भार्इंदर रोडवरील ओल्ड गोल्डन नेस्ट समोरील हिमालय कॉम्प्लेक्स इमारतीत सुरु केली आहे. मीरारोड येथील सॅटेलाईट सेंटर वगळता भार्इंदर येथे एलआयसीची एकमेव शाखा असल्याने येथील आयुर्विमाधारक याच शाखेत आपला विम्याचा हप्ता भरतात. दररोज लाखोंचा व्यवहार होत असलेल्या या शाखेत एलआयसीने कोणतीही सुरक्षिततेची काळजी घेतलेली नाही.
या शाखेत जमा होणारी रक्कम दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यालयात जमा करण्यात येत असल्याने कलेक्शनच्या दिवशी ती अधिकाऱ्यांच्या सेफ्टी ड्रॉव्हरमध्ये ठेवली जाते. यावर पाळत ठेवणाऱ्या चोरट्यांनी ८ जानेवारी २०१५ रोजी मध्यरात्री कार्यालयाचे शटर तोडून सुमारे सव्वादोन लाखांची रोकड लांबविली होती.
या चोरीनंतरही एलआयसी प्रशासनाने कोणतेही सुरक्षिततेचे उपाय योजले नसल्याने यावर्षी २ जानेवारीला पुन्हा अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. ही बाब रविवारी (३ जानेवारीला) सुट्टीच्या दिवशी अत्यावश्यक कार्यालयीन काम निघाल्याने कार्यालयात आलेले अधिकारी गिरकर यांच्या निदर्शनास आली. (प्रतिनिधी)