Stocks of foreign liquor seized in Palghar | पालघरमध्ये विदेशी मद्याचा साठा जप्त

पालघरमध्ये विदेशी मद्याचा साठा जप्त

पालघर : दादरा-नगर-हवेली येथून विदेशी बनावटीच्या बेकायदा मद्याची वाहतूक करणा-यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघरच्या भरारी पथकानेे कारवाई करीत ११७ बॉक्स मद्य व पिकअप टेम्पो असा एकूण १२ लाख ७७ हजार ३८४ रुपये किमतीचा मुद्देमाल पकडला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कासा-उधवा मार्गावर दादरा-नगर-हवेली येथील विदेशी बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघर भरारी पथकाला मिळाली होती. त्याआधारे उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने दोन दिवसांपासून सापळा लावून बुधवारी पहाटे पिकअप टेम्पो समोरून येत असताना उपस्थित पथकाने त्याला थांबवले. त्यांनी टेम्पोची तपासणी केली असता केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा-नगर-हवेली येथील विदेशी बनावटीचे मद्य त्यात आढळले. यावेळी १२ लाख ७७ हजार ३८४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  याप्रकरणी म्हसरोली, विक्रमगड येथील समीर पाटील व अमोल पाटील या आरोपींना अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघर जिल्हा अधीक्षक विजय भुकन, उपअधीक्षक एम.एच. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक व्ही.व्ही. वैद्य, दु.निरीक्षक के.बी. धिंदळे, सोनावणे, मोहिते तसेच जवान बी.बी कराड, आर.एम. राठोड, एस.एस. पवार, चौधरी, पाडवी यांनी ही कारवाई केली.

Web Title: Stocks of foreign liquor seized in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.