फळभाज्यांचा माल घेऊन जाणारी पहाटेची लोकल सुरु करा; वसईकरांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 17:19 IST2020-10-28T17:19:31+5:302020-10-28T17:19:37+5:30
Local Train : वसई तालुका हा कृषी प्रधान असून तेथील शेतकरी आज ही भाजी, केळी, फुले यांचे उत्पादन घेत असून जोडधंदा म्हणून दुधाचाही व्यवसाय करीत आहेत.

फळभाज्यांचा माल घेऊन जाणारी पहाटेची लोकल सुरु करा; वसईकरांची मागणी
वसई :-
वसईतील भाजी उत्पादक, फूल उत्पादक, दूध उत्पादक वसईकर शेतकरी व त्यांचा माल मुंबईस पहाटेच्या वेळेस घेऊन जाणारी बंद झालेली लोकल ट्रेन पुन्हा तात्काळ सुरु करा अशी मागणी ग्राम स्वराज्य अभियान च्या वतीनं मिलिंद खानोलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांच्याकडे केली आहे.
वसई तालुका हा कृषी प्रधान असून तेथील शेतकरी आज ही भाजी, केळी, फुले यांचे उत्पादन घेत असून जोडधंदा म्हणून दुधाचाही व्यवसाय करीत आहेत.
गेली अनेक वर्षे सकाळी विरार स्थानकातून सुमारे पहाटे 3.30 च्या सुमारास सुटणारी पहिली लोकल हि त्या शेतकऱ्याना स्वत:ला व आपला माल मुंबईत विक्रीकरिता नेण्यासाठी अत्यंत सोयीची व उपलब्ध होती.
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून लोकलसेवा बंद करण्यात आली होती. गेल्या काही दिवसापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी व आज रोजी विशेषतः महिलांसाठी लोकल सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने आणि रेल्वे बोर्डाने घेतलेला आहे. त्या सेवा सुरू देखील आहेत.
त्याचप्रमाणे नाशिवंत असलेला भाजीपाला, फुले, आणि दूध याची मुंबईस वाहतूक करून विक्री करू शकत नसल्याने वसईतील उत्पादकांवर आधीच आर्थिक संकट कोसळलेले आहे.
त्यांच्यासाठी असलेली सकाळी विरार स्थानकातून सुमारे पहाटे 3.30 च्या सुमारास सुटणारी पहिली लोकल सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास आणि ती सुरु झाल्यास उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळेल.
एकूणच तसा निर्णय शासनाने तात्काळ घेऊन व त्यास रेल्वे बोर्डाची मंजुरी घेऊन सदरहू लोकल लवकरात लवकर सुरू करावी अशी विनंती ग्राम स्वराज्य अभियानाच्या वतीने संस्थापक संयोजक मिलिंद खानोलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासह पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे देखील केली आहे.