Snake lives in the air conditioner, the subject of kutush among the citizens | सापाचे वास्तव्य थेट एअर कंडिशनरमध्ये, नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय
सापाचे वास्तव्य थेट एअर कंडिशनरमध्ये, नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय

- अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी -  उन्हाची दाहकता कमालीची वाढली असून अंगाची होणारी लाहीलाही टाळण्याकरिता थंडाव्याचा आश्रय घेतला जातोय. दरम्यान माणसांप्रमाणेच साप ही त्याला अपवाद नसून थेट पाच सापांचे एअरकंडिशनर मध्ये वास्तव्य असल्याचा प्रकार डहाणूत समोर आला आहे.
तालुक्याच्या जामशेत गावात युनियन बँकेच्या शाखे समोर जयेश जानी यांच्या घरातील एअरकंडिशनर मध्ये सापांचे वास्तव्य असल्याची माहिती वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन या प्राणीमित्र संस्थेकडे आली. याकरिता सर्पमित्र सागर पटेल घटनास्थळी दाखल झाले.

भिंतीवर लावलेल्या एअरकंडिशनरची पाहणी केली असता, तेथे गॅस पाईपच्या छिद्रात रुखई नावाचे तीन बिनविषारी साप सर्पमित्रांना दिसल्यावर तत्काळ इलेक्ट्रिशनला बोलावून हे उपकरण उघडण्यात आले. त्यानंतर त्यांना बाहेर काढून अधिवासात सोडण्यात आले. तर या घटनेला एका तासाचा अवधी उलटल्यानंतर, पुन्हा त्याच उपकरणात साप असल्याची माहिती घरमालकांनी दिल्याचे सर्पमित्र सागर पटेल यांनी दिली. यावेळी पुन्हा दोन सापांना बाहेर काढल्याचे तो म्हणाला. एकाच जातीचे एकूण पाच साप असून त्यापैकी एक मादी आहे. या सापांचा सध्या प्रजनन काळ असल्याने मादीच्या मागून त्यांनी प्रवेश केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या घटनेनंतर तालुक्यात आश्चर्य आणि कुतूहल या संमिश्र भावना व्यक्त होत आहेत. दरम्यान घर आणि कार्यालयात विजेची उपकरणं वापरताना आणि त्यांची निगा राखताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. "रुखई जातीचे पाच बिनविषारी साप एयरकंडिशनर मध्ये आढळले, सध्या त्या सापांचा प्रजनन काळ असून मादीच्या मागे ते आले असावे. अशा उपकरणात साप आढळने दुर्मिळ बाब आहे."


Web Title: Snake lives in the air conditioner, the subject of kutush among the citizens
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.