टेम्पोच्या बिघाडाने तस्करीचा भंडाफोड
By Admin | Updated: May 6, 2017 05:17 IST2017-05-06T05:17:56+5:302017-05-06T05:17:56+5:30
सागाच्या लाकडांची तस्करी करणाऱ्या टेम्पोंमध्ये बिघाड झाल्याने त्याला जंगलातील आड रस्त्यावर तसेच ठेऊन तस्कर फरार झाले

टेम्पोच्या बिघाडाने तस्करीचा भंडाफोड
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : सागाच्या लाकडांची तस्करी करणाऱ्या टेम्पोंमध्ये बिघाड झाल्याने त्याला जंगलातील आड रस्त्यावर तसेच ठेऊन तस्कर फरार झाले. मात्र, हा प्रकार एका गावकऱ्याच्या लक्षात आल्याने वनविभाग खडबडू जागे झाले आणि त्यानंतर कारवाई करण्यात आल्याचा प्रकार भाताणे वनपरिक्षेत्रामध्ये घडला आहे.
वसई व पालघर तालुक्याच्या वेशीवरील जंगलामध्ये हा प्रकार घडल्याने या भागात लाकडांच्या तस्करीचा राजरोसपणे धंदा सुरु असल्याचा भंडाफोड झाला आहे. जागृत गावकऱ्याच्या खबरीमुळे वनविभागाला जाग आली असली तरी त्यांच्या ढिसाळ कार्यपद्धती यामुळे उघडी पडली आहे. ३ मे च्या सकाळी दरशेत हद्दीतील काही जागृत नागरिकांनी एम एच ०५ के ७८२४ हा टेम्पो अत्यंत दुर्गम असलेल्या वसई व पालघर जिल्ह्याच्या वेशीवरील दारशेत गावाच्या हद्दीतील कच्च्या रस्त्यावर बंद स्थितीत उभे होते. त्यामध्ये लाकडी ओंडके भरलेले असल्याची खबर भाताणे रेंजला एका गावकऱ्याने कळवली. त्यानंतर वनक्षेत्रपाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनखात्याची टीम त्या ठिंकाणी धडकली.
हा भाग हा दुर्गम असला तरी आमची नेहमीच टेहळणी सुरु असते. त्यामुळे आजपर्यंत अनेक लाकूड तस्करी उघड करण्यात आम्हाला यश आले आहे. या भागातील लाकूड तस्करी रोखण्यासाठी गस्ती फेऱ्या वाढवल्या आहेत अशी माहिती वनक्षेत्रपाल चव्हाण यांनी लोकमतला दिली.