बाजारात गणेशगीतांच्या सीडीची धूम
By Admin | Updated: September 1, 2014 17:09 IST2014-09-01T04:45:14+5:302014-09-01T17:09:38+5:30
गणेशगीतांच्या सीडींनी बाजारात धूम माजवली आहे. नव्या गायकांच्या नव्या दमाच्या गणेशगीतांच्या सीडी बाजारात उपलब्ध आहेत

बाजारात गणेशगीतांच्या सीडीची धूम
ठाणे : गणेशगीतांच्या सीडींनी बाजारात धूम माजवली आहे. नव्या गायकांच्या नव्या दमाच्या गणेशगीतांच्या सीडी बाजारात उपलब्ध आहेत. मात्र लता मंगेशकर, प्रल्हाद शिंदे व सुरेश वाडकर यांनी गायलेल्या गाण्यांच्या सीडींना बाजारात मागणी आजही कायम आहे.
नव्याची नवलाई काय आहे?
मंगेश चव्हाण यांची पार्वतीच्या बाळा ही नवी सीडी बाजारात आली आहे. तिला चांगली मागणी आहे. याशिवाय ११७ नॉनस्टॉप गणपतीची गाणी, उदो बोला उदो माझ्या गणरायाचा, ढमाक ढम ढोल वाजे, गणपती बोले, मांडवात आला लालबागचा राजा, किसन नानाने नवस केला गणरायाचा, महाराष्ट्राची शान श्री महागणपती, लालबागच्या राजाचा विजय असो, सुखी ठेव गणराया आदी गाणी असलेल्या नव्या सीडी बाजारात आहेत. लालबागच्या राजा ही सीडी नवीन आली आहे. युनिव्हर्सल म्युझिकची स्वर गणेशा व व्ही.के. वैशंपायन शास्त्री यांनी सांगितलेली गणेशपूजेची सीडी बाजारात विकली जात आहे. या दोन्ही सीडींना गेल्या तीन वर्षांपासून चांगली मागणी आहे.
मुहूर्त साधण्यासाठी भटजी मिळत नसल्याने प्रथम सीडी ऐकावी लागते. त्यानंतर, पूजेसाठी ती लावण्यात येते. मुहूर्त महत्त्वाचा असतो. भटजी मिळत नाहीत. त्यामुळे पूजेची सीडी लावून पूजा केली जाते. दादरचे सीडीविक्रेते सचिन कवळी यांनी सांगितले की, काही जणांना फास्ट ट्रॅक व काही जणांना स्लो ट्रॅकची गाणी आवडतात. डीजेचा क्लास कमी होत आहे. सीडीच्या किमतीत वाढ होत नाही. या सीडी १०० रुपयांना आहे. सीडी लवकर खराब होत नसल्याने वारंवार खरेदी केली जात नाही. बाजारात मालाला उठाव नाही. पावसामुळेही ग्राहक कमी होतात.
स्मार्टफोनचा फटका
डोंबिवलीतील सीडीविक्रेते संजय जैन यांनी सांगितले, गणेशोत्सवात सीडी विक्रीची एक लाखाची उलाढाल होत होती. आता स्मार्टफोनमुळे मार्केट डाऊन आहे. अनेक लोक गाणी डाऊनलोड करतात. त्यामुळे या व्यवसायात थोडी मंदीची लाट आहे. चित्रपटगीतांच्या चालीवर बांधलेली गणेशगीते बाजारात आली आहेत. (प्रतिनिधी)