बाजारावरील मंदीचे सावट पौषासह सरले
By Admin | Updated: February 24, 2016 02:56 IST2016-02-24T02:56:36+5:302016-02-24T02:56:36+5:30
२१ व्या शतकात समाजावरील शुभ-अशुभतेचा पगडा तसूभरही कमी झालेला नाही. किंबहुना त्याच मानसिकतेतून पौष महिन्यात मंगलकार्य करणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे माघ महिन्याला

बाजारावरील मंदीचे सावट पौषासह सरले
बोर्डी : २१ व्या शतकात समाजावरील शुभ-अशुभतेचा पगडा तसूभरही कमी झालेला नाही. किंबहुना त्याच मानसिकतेतून पौष महिन्यात मंगलकार्य करणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे माघ महिन्याला प्रारंभ झाल्यानंतर ठिकठिकाणी गृहशांती, सत्यनारायण पूजा, साखरपुडा तसेच लग्नकार्य पार पाडण्याची घाई केली जात असल्याने बाजारातील मंदीचे सावट निवळले आहे.
हिंदु धर्मात व्रत वैकल्यांना महत्वाचे स्थान असून पुजाविधी, मंगलकार्य कोणत्या महिन्यात करावे अथवा करू नये या बाबत धार्मिक संकल्पना आहेत. त्यानुसार चैत्र, श्रावण, भाद्रपद इ. महिन्यात सर्वाधिक पूजाविधी पार पाडले जातात. तर पौष महिन्यात कोणतेही धार्मिक कार्य केले जात नाही. मात्र त्याला शास्त्राधार नसल्याचे पुरोहितांचे म्हणणे आहे. या शुभ -अशुभतेचा परिणाम माणसांच्या जीवनावर कितपत होतो हा संशोधनाचा विषय असला तरी बाजारातील आर्थिक उलाढालीवर नक्कीच होताना दिसून येतो. मंगलकार्याविना फुल ेव फळे बाजार, सोने व कपडे खरेदी, मंडप, डेकोरेशन, कॅटरींग, बॅन्जो, हॉल, व्हिडीओ शुटींग इ.वर मंदीच असते.
दरम्यान माघ महिन्याला प्रारंभ झाल्यापासून गृहशांती, सत्यनारायण पूजा, साखरपुडा, लग्नकार्य इ. ची धावपळ सुरू झाली आहे. एखाद्या मुहूर्तासाठी भटजीकडे अडून बसणारे, तगादा लावणारे मनासारखा मुहूर्त वा तारीख न मिळाल्यास खट्टू होणारे महाभाग याच काळात दृष्टीस पडतात. विविध मंगलकार्यांना प्रारंभ झाला असून त्यामुळे बाजारात तेजी दिसून येत आहे. पुरोहितांची धावपळ सुरू असून मला वेळ नाही, दुसरा कुणीतरी पहा असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. (वार्ताहर)
पौष महिन्यात मंगलकार्य पार न पाडण्याला कोणताच शास्त्रीय आधार नाही हे नागरीकांना पटवून दिले जाते. परंतु धार्मिक पगडा जबरदस्त असल्याने या महिन्यात धार्मिक विधी सहसा केले जात नाहीत.
- धनंजय पंडीत, पुरोहीत डहाणू, आगार
पौष महिना सरल्यानंतर माघ महिन्यात पूजाविधी, साखरपुडा, लग्नकार्य इ. करीता मंडप, रोषणाई, डेकोरेशन इ. मागणी वाढली आहे.
- हसमुख किणी, मंडप व्यवसायीक, चिखले