घोडबंदर किल्ल्यावर साजरी होणार शिवजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:02 IST2020-02-16T00:02:41+5:302020-02-16T00:02:53+5:30
संडे अँकर । पालिकेला दिला दत्तक : इतिहास जागवण्यासाठी विविध कार्यक्रम

घोडबंदर किल्ल्यावर साजरी होणार शिवजयंती
मीरा रोड / भाईंदर : छत्रपती शिवाजी महाराजांची १९ फेब्रुवारी रोजी असलेली जयंती ऐतिहासिक अशा घोडबंदर किल्ल्यावर महापालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असल्याची माहिती महापौर डिम्पल मेहता व उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. सरकारने हा किल्ला महापालिकेला दत्तक दिला असून शिवरायांचा इतिहास किल्ल्यात जागवण्यासाठी विविध कार्यक्रम होणार आहेत.
मीरा-भार्इंदर शहरातील घोडबंदर गावात असलेला हा किल्ला व चौक येथील धारावी किल्ला हे दोन्ही शहराच्या ऐतिहासिक वारसाचे प्रतीक आहेत. यातील घोडबंदर किल्ला हा सरकारच्या राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजनेंतर्गत महापालिकेने दत्तक घेतला आहे. या किल्ल्याची डागडुजी व सुशोभीकरणासाठी महापालिकेने पाच कोटी ४७ लाखांची तरतूद केली असून त्यातील ५० लाख प्रवेशद्वारासाठी राखीव ठेवले आहेत. पहिल्या टप्प्यातील कामाची सुरुवात झाली असून त्यासाठी एक कोटी ८१ लाख ६८ हजारांची तरतूद केली आहे. किल्ल्याच्या डागडुजीचे काम पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यासाठीचे सल्लागार व कंत्राटदारही त्याच विभागाने सुचवलेले आहेत. किल्ल्याला पूर्वीच्या कंत्राटदाराने सिमेंटचे प्लास्टर करून टाकले होते. ते काढून चुनाखडीसह वनस्पतींचा वापर करून तयार केलेल्या मिश्रणाचा उपयोग डागडुजीसाठी केला जात आहे. किल्ला सुमारे साडेचार एकरमध्ये असून आजूबाजूची १५ एकर सरकारी जागा ताब्यात आली असून त्यावर शिवसृष्टी साकारण्यात येणार आहे. घोडबंदर गावाच्या मुख्य मार्गावर महामार्गाजवळ ३० फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार असून त्यासाठी दोन कोटी ९२ लाखांची मंजुरी महासभेने दिली आहे. किल्ल्याकडे येणाऱ्या मार्गावर प्रवेशद्वार केले जाणार आहे.
घोडबंदरच्या या पुरातन किल्ल्याच्या गतवैभवाची माहिती शहरवासीयांना व्हावी म्हणून यंदाची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. किल्ल्यात महाराजांचा दरबार साकारला जाणार आहे. त्याआधी गावातून शोभायात्रा काढली जाणार आहे. तलवारबाजी व दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके होतील. पोवाडे, गोंधळ, वाघ्यामुरळी, शौर्यगीते यासह पारंपरिक कोळी, आदिवासी नृत्य सादर केली जाणार आहेत. या वेळी महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक तसेच पत्रकारांचा फेटे बांधून सत्कार केला जाणार आहे.