शेअर टॅक्सीत महिला मागेच

By Admin | Updated: February 26, 2015 01:36 IST2015-02-26T01:35:39+5:302015-02-26T01:36:43+5:30

प्रवासात महिला प्रवाशांची होणारी छेडछाड आणि लगट थांबविण्यासाठी शेअर टॅक्सीत पुढची सीट महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय परिवहनमंत्री

Share taxi in women beforehand | शेअर टॅक्सीत महिला मागेच

शेअर टॅक्सीत महिला मागेच

मुंबई : प्रवासात महिला प्रवाशांची होणारी छेडछाड आणि लगट थांबविण्यासाठी शेअर टॅक्सीत पुढची सीट महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतला आणि या सेवेचे दणक्यात उद्घाटन रावते यांनी मंत्रालयाजवळ केले. मात्र, ही सेवा सुरू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी परिवहनमंत्रीच काय तर परिवहन विभागातील अधिकारी आणि वाहतूक पोलीसही फिरकले नाहीत. शेअर टॅक्सीत पुढची सीट महिलांसाठी राखीव ठेवली जाते का? याचे ‘लोकमत’कडून रिअ‍ॅलिटी चेक केल्यानंतर घोषणा दणक्यात... अंमलबजावणीचा मात्र फुसका बार, अशी स्थिती उघड झाली.
शेअर टॅक्सीतून प्रवास करताना अनेकदा महिलांशी पुरुष प्रवाशांकडून लगट करण्याचे प्रकार घडतात. तीन पुरुषांसोबत एक महिला प्रवासी टॅक्सीतून प्रवास करत असल्यास अशा वेळी एखादा पुरुष प्रवासी चालकाच्या बाजूला बसलेला असतो आणि त्यामुळे महिला प्रवाशाला मागील सीटवर अन्य दोन पुरुष प्रवाशांच्या बाजूलाच बसावे लागते. या प्रवासात कधी कधी पुरुष प्रवाशांकडून लगट करण्याचा प्रयत्नही होतो. यावर खुद्द परिवहनमंत्र्यांकडे आणि परिवहन विभागाकडे तक्रारी आल्यानंतर शेअर टॅक्सीत महिला प्रवाशांसाठी पुढची सीट राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अमलबजावणी २ फेब्रुवारीपासून झाली. शेअर टॅक्सींच्या मार्गांवर महिलांसाठी या संदर्भात फलक लावण्याचे आदेश देतानाच टॅक्सीतून महिला प्रवासी प्रवास करत नसतील तर महिलांच्या राखीव आसनावर पुरुष प्रवासी प्रवास करू शकतील, असेही नमूद करण्यास सांगण्यात आले. तसेच चालकाने आणि पुरुष प्रवाशांनीही यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. परंतु शेअर टॅक्सीत महिलांना राखीव आसनाची अंमलबजावणी कुठेच होत नसल्याचे ‘लोकमत’कडून करण्यात आलेल्या रिअ‍ॅलिटी चेकमधून समोर आले. शेअर टॅक्सी चालकाकडून तर या आदेशाची अंमलबजावणी सपशेल धुडकावून लावली जात आहे. पुरुष प्रवासीही माहिती असून नसल्यासारखेच वागत असल्याचे दिसून आले. जादा पैसे कमविण्याचा प्रयत्नात काही मार्गांवर शेअर टॅक्सी चालक पुढील सीटवर दोन प्रवासी बसवत आहेत. त्यामुळे एका महिला प्रवाशाला मागील सीटवर बसण्याशिवाय पर्यायच राहत नाही. काही मार्गांवर तर या आदेशाची चालक आणि पुरुष प्रवाशांना माहिती नसल्याचे समोर आले. (प्रतिनिधी)
 

Web Title: Share taxi in women beforehand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.