शेतमजूरांची तीव्र टंचाई!

By Admin | Updated: November 8, 2016 02:03 IST2016-11-08T02:03:06+5:302016-11-08T02:03:06+5:30

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी हे आदिवासी तालुके विविध व्यवसाय तसेच उद्योग-धंद्या करिता मजुरांचा पुरवठा करणारेम्हणून ओळखले जातात

Severe shortage of livelihood! | शेतमजूरांची तीव्र टंचाई!

शेतमजूरांची तीव्र टंचाई!

अनिरुद्ध पाटील, डहाणू/बोर्डी
पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी हे आदिवासी तालुके विविध व्यवसाय तसेच उद्योग-धंद्या करिता मजुरांचा पुरवठा करणारेम्हणून ओळखले जातात. सध्या या दोन्ही तालुक्यात खरीपातील भात कापणी व झोडणीची कामे सुरू आहेत. परंतु येथील मजूर कामानिमित्त अन्य जिल्ह्यामध्ये आणि राज्यात गेल्याने शेती करीता मजुरांचा तुटवडा भासत आहे.
अनेक दशकांपासून येथे रोजगार संधीची कमतरता असल्याने वर्षातील आठ महिन्यांसाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांची संख्या अधिक आहे. अरबी समुद्रातील गुजरातपासून ते गोव्यापर्यंत मच्छीमारी बोटींवर जाणाऱ्या आदिवासी तांडेल व खलाशांचे प्रमाण अधिक आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरात हॉटेल व्यवसायाकरिता वेटर आणि बांधकाम व्यवसायासाठी गवंडी आणि अकुशल मजुरीवर अनेक बिऱ्हाडे जातात. लगतच्या गुजरात राज्यात शेतमजुरीवर दगडखाण, वीटभट्टी, ट्रॅक्टर व ट्रक चालक म्हणून जाणारेही अधिक आहेत.
दरम्यान, या दोन्ही तालुक्यात खरीपातील भात हे मुख्य पीक असून, कापणी आणि झोडणीच्या कामाला एकाच वेळी सुरूवात झाली आहे. शिवाय हा रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी मशागतीचा प्रारंभ काळ आहे. त्यामुळे मजुरांचा तुटवडा भासत असून, मजुरांच्या तालुक्यात मजूर टंचाईचे विरोधाभास दाखवणारे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे काही गावात शेतमजूराच्या रोजीचा दर ३०० ते ४०० रूपयांवर गेला आहे
या दोन्ही तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांवर प्राथमिक शाळा उभ्या राहिल्याने बालकं शिक्षणाच्या प्रवाहात ओढली गेली आहेत. त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थांचे प्रमाण कमालीचे घटल्याने शेतीशी निगडीत गोवारी पद्धत कालबाह्य ठरली आहे. माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी तालुका तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी वसतीगृहात जाऊन अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तंत्रशिक्षण, डी.एड., बी.एड धारकांच्या संख्येत प्रतिवर्षी भर पडत आहे.

Web Title: Severe shortage of livelihood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.