नालासोपारा - आईच्या हातात असलेल्या सात महिन्यांच्या बाळाचा २१ व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची दुर्घटना बुधवारी दुपारी विरारच्या बोळींज येथील जॉय विले परिसरात घडली. आई खिडकी बंद करीत असताना जमिनीवर सांडलेल्या पाण्यावरून तिचा पाय घसरल्याने तोल गेला आणि तिच्या खांद्यावरून बाळ खाली पडले.
जॉय विले नावाच्या निवासी संकुलातील २१ व्या मजल्यावरील २,१०४ या सदनिकेत विकी सदाने आणि पूजा सदाने हे दाम्पत्य राहते. त्यांंना सात महिन्यांचे बाळ होते. बुधवारी सव्वा तीनच्या सुमारास पूजा या बाळाला खांद्यावर घेऊन खिडकी बंद करण्यासाठी गेल्या. खिडकीजवळ पाणी पडल्याने त्यांचा पाय घसरला आणि त्यांचा तोल गेला. यामुळे त्यांच्या खांद्यावर असलेले बाळ २१ व्या मजल्यावरून खाली पडले. यात बाळाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने सदाने कुटुंबीय हादरले आहेत.
सात वर्षांनी झाले होते बाळ सदाने दाम्पत्याला सात वर्षांनंतर बाळ झाले होते. मंगळवारी बाळाला ७ महिने पूर्ण झाले होते. बुधवारी विकी नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. बाळाला बघण्यासाठी काही नातेवाईक घरात आले होते. इतर नातेवाईक घरात होते. यावेळी बाळाची आई खिडकी बंद करताना तिचा तोल गेला आणि खांद्यावरील बाळ खाली पडल्याची माहिती बोळींजचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी दिली. या खिडकीला पूर्ण जाळी नव्हती. या प्रकरणी बोळींज पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.