स्मार्ट पाटीने मराठी भाषा विकासाचा शाळांचा प्रयत्न; मराठी भाषा दिन विशेष उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:02 IST2020-02-26T23:02:01+5:302020-02-26T23:02:19+5:30
लेखन - वाचन करण्यासाठी आनंददायी, आकर्षक उपक्रम

स्मार्ट पाटीने मराठी भाषा विकासाचा शाळांचा प्रयत्न; मराठी भाषा दिन विशेष उपक्रम
- अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आगवन शिशुपाडा या शाळेत लेखन - वाचन करण्याची पद्धत आनंददायी करण्यासाठी आकर्षक रंगीत तसेच स्मार्ट पाटीचा उपक्रम राबविला जात आहे.
या शाळेतील विद्यार्थ्यांची बोलीभाषा वारली असून ते मराठीतून शिक्षण घेतात. त्यामुळे अध्ययन-अध्यापनात हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मराठी भाषेतील शब्दसंपत्तीत वाढ होणे आवश्यक आहे. त्यामुळेच विद्यार्थी प्रगल्भ बनून शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवता येईल या संकल्पनेतून ‘स्मार्ट पाटी’ची निर्मिती करण्यात आल्याची माहिती शाळेच्या शिक्षिका वरुणाक्षी आंद्रे यांनी दिली.
या पाटीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यावर विद्यार्थी अक्षरलेखन, गिरवणे, चौदाखडी, अक्षरापासून शब्द तयार करणे, अक्षर कोडी सोडविणे (वार, रंग, फुले-फळे, वाहनांची नावे) छोटी वाक्य तयार करणे अशा कृती विद्यार्थी स्केचपेनने पाटीवर लेखन-वाचन सराव करता येतात. त्यानंतर कापडाने पाटी पुसून पुन्हा वापरण्यास तयार होते. अशा कृतीयुक्त वैयक्तिक व गट पद्धतीने विद्यार्थी शिकत आहेत. स्मार्ट पार्टीच्या सरावाने विद्यार्थी प्रगत होतील, असा विश्वास उपक्रम राबवणाऱ्या या शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केला आहे. शिक्षकांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.