शाळकरी मुलांच्या बॅगेत चॉकलेटऐवजी सॅनिटायझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 12:22 AM2021-02-11T00:22:05+5:302021-02-11T00:22:19+5:30

कोरोनाची भीती कायम

Sanitizer instead of chocolate in school bags | शाळकरी मुलांच्या बॅगेत चॉकलेटऐवजी सॅनिटायझर

शाळकरी मुलांच्या बॅगेत चॉकलेटऐवजी सॅनिटायझर

Next

- शशिकांत ठाकूर

कासा : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने  गेल्या दोन महिन्यांपासून शासनाने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले, तर २७ जानेवारीपासून  इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे पालघर जिल्ह्यातही सदर वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाची अद्याप  भीती कायम असल्याने व दक्षता म्हणून एरव्ही चॉकलेट, खाऊ बॅगेत ठेवणारे विद्यार्थी आता बॅगेत सॅनिटायझरही आवर्जून  ठेवत आहेत.

 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मार्च महिन्यापासून राज्यातील सर्व शाळा बंद होत्या. मात्र, तब्बल  नऊ महिन्यांनंतर कोरोना रुग्णांची घटणारी संख्या व  कोरोनावर लस सापडली असून आता लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे  ग्रामीण भागात ८० ते ९० टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार झाले आहेत. जिल्ह्यातील शहरी भागांतील शाळाही सुरू झाल्या असून तिथेही ६० ते ७० टक्के पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास संमती दर्शवली आहे. यामध्ये  बोर्ड परीक्षा विचारात घेऊन १० वीची विद्यार्थीसंख्या शाळांना जास्त उपस्थिती दिसते.

शासनाच्या आदेशानुसार आता  तीन ते चार तास शाळा भरवली जाते आणि सलग मध्ये कोणतीही सुट्टी नसते. त्यामुळे विद्यार्थी घरूनच जेवून येतात. विद्यार्थ्यांनी स्वतःची पाणीबॉटल  आणावी. शाळा परिसरात  कोणत्याही इतर बाहेरच्या व्यक्तीला परवानगी नाही, अशा सूचना आहेत. दरम्यान, गेल्या १० महिन्यांपासून कोरोनामुळे पालक मुलांना बाहेरील वस्तू खाण्यास देत नाहीत. त्यामुळे आता शाळा सुरू झाल्या, तरी मुले कोरोनाच्या भीतीने बाहेरील वस्तू सहसा खात नाहीत. बऱ्याच महिन्यांपासून बाहेरील वस्तू मिळत नसल्याने मुलांनाही त्याची जाणीव होऊ लागली आहे. पालकही या बाबतीत मुलांना सूचना देत असल्याचे दिसून येते. त्यामुळे एरव्ही चॉकलेट व इतर खाऊ बॅगेत आणणारे विद्यार्थी आता आणत नाहीत. मात्र, कोरोना खबरदारी उपाय म्हणून सॅनिटायझर बॅगेतून आणत आहेत. 

प्रवासात व शाळेत कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आम्ही सॅनिटायझर वापरतो. 
- राज वाघ, 
इयत्ता ६ वी.

शाळेत आल्यावर काही वस्तूंना स्पर्श होतो. त्यामुळे कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून बॅगेत सॅनिटायझर ठेवतो.
- प्रणय चौरे, इयत्ता १० वी 

शाळा सुरू झाली आहे, तरी अजूनही कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे आमच्याजवळ सॅनिटायझर ठेवतो.
- श्रेयस ठाकूर, इयत्ता ६ वी 

आपले हात स्वच्छ राहावे.  त्यामुळे कोरोना खबरदारी म्हणून आम्ही बॅगेत सॅनिटायझर घेऊन येतो.
- मनस्वी पाटील, इयत्ता १० वी 

Web Title: Sanitizer instead of chocolate in school bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.