पाच गावांचे धूपप्रतिबंधक बंधारे नामंजूर!

By Admin | Updated: May 11, 2017 01:41 IST2017-05-11T01:41:26+5:302017-05-11T01:41:26+5:30

या जिल्ह्यातील समुद्रकिनारपट्टीवर वसलेल्या सातपाटी, तारापूर सह अन्य पाच गावांलगतच्या किनारपट्टीवर उभारण्यात येणाऱ्या

Sanctuary bunds of five villages are disapproved! | पाच गावांचे धूपप्रतिबंधक बंधारे नामंजूर!

पाच गावांचे धूपप्रतिबंधक बंधारे नामंजूर!

हितेन नाईक।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : या जिल्ह्यातील समुद्रकिनारपट्टीवर वसलेल्या सातपाटी, तारापूर सह अन्य पाच गावांलगतच्या किनारपट्टीवर उभारण्यात येणाऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची मंजुरी (एनओसी) महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने (सीआरझेड) नामंजूर केल्याने हे बंधारे रद्द झाले आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात समुद्रात निर्माण होणाऱ्या तुफानी लाटांच्या तडाख्याने किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होणार असून त्यांची घरकुलेही भुईसपाट होणार आहेत.
महाराष्ट्रातील ७२० किमीच्या प्रदीर्घ समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या मच्छीमार व इतर समाजाची घरे, शेती यांची होणारी धूप रोखण्यासाठी विविध संस्था, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींंच्या मागणी वरून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. रायगड जिल्ह्यातील मांडवा, रेवदंडा, नावेदर-नवेगाव, सासवणे या चार गावसह मुंबई मधील वर्सोवा येथील सागर कुटीर ते हिंदू स्मशानभूमी, हिंदुजा हॉस्पिटल माहीम, हाजी अली दर्गा, प्रियदर्शनी पार्क, मलबार हिल, वाळकेश्वर, गीता नगर कुलाबा, रेडिओ क्लब ते अपोलो बंदर आदींसह पालघर जिल्ह्यातील सातपाटी (४२५ मीटर),आशापुरा मंदिर, एडवण (१२५ मीटर), नवापूर (१५० मीटर), तारापूर मांगेला आळी (१३८ मीटर) आणि घिवली या पाच किनारपट्टीवरील गावासाठी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांना मंजुरी मिळून सीआरझेड विभागाचा नाहरकत दाखला मिळणे बाकी होते.
महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या २३ मार्च रोजी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे सर्व प्रस्ताव तपासण्यात आले. हे बंधारे किनाऱ्याजवळ उभारण्यात येणार असल्याने व या जागा पर्यावरणपूरक तिवरांची झाडे, मासे प्रजनन क्षेत्र, वन्यजीव क्षेत्र, समुद्री कासवे, नैसर्गिक सौंदर्य स्थळे,ऐतिहासिक स्थळे ई बाबी बाबत संवेदनशील असल्याने याला ते बाधित होऊ शकत असल्याने त्यांची मान्यता रद्द करण्यात आली. समुद्राचे प्रवाह ऋतूमानाप्रमाणे बदलत असतात त्या प्रवाहा मुळे समुद्रालगत असलेल्या वाळूचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होत असते.
अशा वेळी एखाद्या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा बांधल्यास या वाळूच्या नैसर्गिक वहन प्रक्रि येत बदल होऊन समुद्र, खाडीत मोठमोठे वाळूचे ढीग जमा व्हायला सुरुवात होते आणि दुसऱ्या बाजूने समुद्राची धूप व्हायला सुरुवात होत असल्याचे पर्यावरणाचे अभ्यासक भूषण भोईर यांनी लोकमत ला सांगितले. याच काही कारणा मुळे आणि सीआरझेड १ मधील नियमाचा आधार घेऊन या सर्व बंधाऱ्यांची मंजुरी नाकारण्यात आली आहे. हे बंधारे ज्या ठिकाणी उभारण्यात येणार होते त्याचा सर्व्हे (आकृती बंध) सीआरझेड प्राधिकरण समितीच्या अधिकाऱ्यांनी नैसिर्गक समुद्र किनारे भौगोलिक शास्त्राअंतर्गत केल्यानंतर ते नामंजूर करण्यात आल्याचे सीआरझेडच्या चेअरमन नी घोषित केले आहे.

Web Title: Sanctuary bunds of five villages are disapproved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.