वसई विरारमधील 145 अधिकृत रिक्षातळांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:47 IST2020-12-05T12:47:26+5:302020-12-05T12:47:56+5:30
Vasai Virar News: प्रथमच महिला रिक्षा चालकांसाठी विरार व नालासोपारा येथे दोन रिक्षा तळांना मंजुरी; वसई तालुक्यातील ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाच्या मागणीला यश

वसई विरारमधील 145 अधिकृत रिक्षातळांना मंजुरी
-आशिष राणे
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसई विरार शहर महापालिका क्षेत्रामध्ये आजवर रिक्षा उभ्या करण्यासाठी अधिकृतरित्या रिक्षातळ नव्हते. त्यामुळे बऱ्याच कालावधी पासून वसईत अधिकृत रिक्षातळ मंजुर करण्यासाठी ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघ पालघर यांनी सातत्याने आपले प्रयत्न सुरू ठेवले आणि नुकतेच वसई तालुक्यातील 145 अधिकृत रिक्षा तळाना सर्वेक्षणाअंती मंजुरी देण्यात आली असल्याचे महासंघाचे अध्यक्ष विजय खेतले यांनी लोकमतला सांगितले.
विशेष म्हणजे वसईत पहिल्यांदाच महिला रिक्षा चालकांसाठी देखील विरार व नालासोपारा येथे दोन रिक्षा तळांना मंजुरी देत आरटीओ ने एकारर्थी दिलासा दिला आहे. तत्कालीन वसई आरटीओ अधिकारी अनिल पाटील यांनी तालुक्यातील रिक्षा तळ सर्व्हे करण्याचे आदेश पूर्वीच दिले होते.
त्यानुसार अखेर फेब्रुवारीमध्ये तालुक्यातील 256 रिक्षा तळाचा सर्व्हे करण्यात आला होता व त्यातील 145 रिक्षा तळांना मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या दि.1 जून 2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यात प्रथमच महिलांना विरार व नालासोपारा पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर प्रत्येकी पाच रिक्षा अधिकृतपणे उभ्या करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
वसई तालुक्यात अनेक वर्षापासून अधिकृत रिक्षा तळ मंजुर व्हावेत असे विविध रिक्षा संघटना व ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाने मागणी केली होती. तत्कालीन आरटीओ अधिकाऱ्यांनी यासाठी वाहतूक शाखा वसई व महापालिका यांना पत्र देऊन रिक्षा तळांसाठी सर्व्हे करून अहवाल मागीतला होता. त्यासाठी उप्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे मोटर वाहन निरीक्षक व वाहतुक शाखा वसई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा दोन्ही पदांची रिक्षा स्टँड सर्वेक्षण करता नियुक्ती केली होती.
त्यांच्या सोबत महापालिकेचे अभियंता, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, प्रवासी संघटना आदी या सर्वांनी मिळून फेब्रुवारी 2020 मध्ये वसई तालुक्यातील जवळजवळ 256 रिक्षा स्टँडचा सर्व्हे र्केला. या सर्वेक्षणाचा यापूर्वीच अहवाल मंजुरीसाठी मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण यांच्याकडे पाठवण्यात आला होता अखेर या अनुषंगाने आशिषकुमार सिंह प्रधान सचिव गृहविभाग (परिवहन) यांच्या अध्यक्षतेखाली दि.19 जून 2020 रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये वसई येथिल 145 रिक्षा स्टँडच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
या बैठकीला शेखर चन्ने परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मधुकर पांडे-सहपोलीस आयुक्त (वाहतूक) यांच्या सहीत सर्व अधिकरी वर्ग उपस्थित होते. या एकूणच निर्णयामुळे वसईत रिक्षा चालक मालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रात नवनवीन वसाहती वाढल्यामुळे रिक्षा तळांची तेवढीच गरज आहे. ज्या रिक्षातळांना मंजुरी दिली नाही, त्या रिक्षा तळांची जागा पुढेमागे व आजूबाजूला करून व पुन्हा सर्व्हेक्षण करून त्यांना त्याच ठिकाणी अ,ब,क, पद्धतीने मंजुरी द्यावी. तर वर्षानुवर्षे असलेले रिक्षा तळांना देखील मंजुरी देण्यात आलेली नाही.
याबाबत पुन्हा विचार करून लवकरच उर्वरित 100 रिक्षा तळांना मंजुरी द्यावी. तसेच महिला रिक्षा चालकांना परिवहन व वाहतुक विभागाने मंजूर केलेल्या स्वतंत्र रिक्षा तळांमुळे आता महिला व पुरूष रिक्षा चालकांमध्ये होणारा वाद बहुतांश प्रमाणात कमी होईल.
- विजय ग. खेतले
अध्यक्ष , ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक महासंघ