एकाच अधिकाऱ्याकडे तीन तालुक्यांचा कार्यभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 23:56 IST2020-02-14T23:55:51+5:302020-02-14T23:56:00+5:30
प्रशासन उदासीन : काम करताना करावी लागते कसरत, तिन्ही तालुक्यांतील नागरिकांचीही होते गैरसोय

एकाच अधिकाऱ्याकडे तीन तालुक्यांचा कार्यभार
वसंत भोईर।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन अनेक वर्षे उलटली असली तरी अनेक कार्यालये अद्यापही पालघर येथे सुरू झालेली नाहीत तसेच अनेक खात्यांत अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील पी.एस. कुलकर्णी या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंत्याला तीन तालुक्यांचा कार्यभार सांभाळावा लागत असल्याने त्यांना कामासाठी कसरत करावी लागत आहे, मात्र याबाबत प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.
वाडा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात उपअभियंता म्हणून पी.एस. कुलकर्णी हे गेल्या तीन वर्षापासून कार्यरत आहेत. हे काम करीत असतानाच त्यांच्याकडे जव्हार व मोखाडा या दोन तालुक्यांच्या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंतापदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या तीनही तालुक्यांचे काम करताना त्यांना कसरत करावी लागत आहे. वाडा येथे त्यांचे सोमवार व गुरुवार, जव्हार येथे मंगळवार, बुधवार तर मोखाडा येथे शुक्रवार, शनिवार असे वार आहेत. त्यातच जिल्हा व तालुक्यांच्या बैठका, मंत्री महोदयांचे दौरे आदी असल्याने त्यांना कामे करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
वाडा, जव्हार व मोखाडा हे तीनही तालुके आदिवासीबहुल आहेत. येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मार्चपासूनच पाण्याचे दुर्भिक्ष्य या तीनही तालुक्यांत जाणवत असून पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशातच एका अधिकाºयाकडे तीनही तालुक्यांचा पदभार असल्याने धड एका तालुक्यातही म्हणावे तसे लक्ष त्यांना देता येत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. या तीनही तालुक्यांतील अनेक गावांत पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. या कामांवरही त्यांना लक्ष देता येत नसल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
तालुक्यातील कुडूस येथे सन २०१२ पासून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून सहा-सात वर्षातही हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे शासनाचा शुद्ध व घरोघरी पाणी देण्याचा हेतू सफल होताना दिसत नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण होऊन नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता यांचा अन्य तालुक्यांचा पदभार काढून घेऊन त्यांना वाडा येथेच कार्यरत करावे. अन्यथा आमच्या संघटनेला आंदोलन छेडावे लागेल.
- अनंता वनगा, अध्यक्ष,
आदिवासी मुक्ती मोर्चा संघटना
माझ्याकडे तीन तालुक्यांचा कार्यभार असून त्या-त्या तालुक्यांसाठी मी वार दिलेले आहेत. जिल्हा परिषदेत फक्त दोनच उपअभियंते असून तेच कार्यभार सांभाळत आहेत.
- पी.एस.कुलकर्णी, उपअभियंता,
पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती वाडा