सायनमध्ये दोन हजार नव्या मतदारांची नोंद
By Admin | Updated: October 7, 2014 02:25 IST2014-10-07T02:24:31+5:302014-10-07T02:25:14+5:30
नव्या मतदारांची पडलेली भर यामुळे सायन-कोळीवाडा मतदारसंघात मतदारांची एकूण संख्या २ लाख ५४ हजार १६३ पर्यंत पोहोचली आहे

सायनमध्ये दोन हजार नव्या मतदारांची नोंद
मुंबई : नव्या मतदारांची पडलेली भर यामुळे सायन-कोळीवाडा मतदारसंघात मतदारांची एकूण संख्या २ लाख ५४ हजार १६३ पर्यंत पोहोचली आहे. या वाढलेल्या मतदारांचा फायदा उमेदवार घेण्याच्या तयारीत असून त्याचा फायदा नक्की कोणाला मिळणार हे पाहण्यासारखे असेल. आता २ हजार ८२0 नवीन मतदारांची नोंद झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षांचा कस लागला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना, भाजपा महायुती तुटल्याने या पक्षांकडून स्वतंत्र उमेदवार उभे करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मनसेसह अन्य राजकीय पक्षांनीही आपले उमेदवार उभे केले असून या निवडणुकीत सगळ्यांचाच कस लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराकडून आपला मतदारसंघ पिंजून काढला जात आहे. सायन-कोळीवाडा मतदारसंघातही तीच परिस्थिती आहे. आता या मतदारसंघात आणखी नव्या मतदारांची भर पडली असून ती मते मिळणार कुणाला याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सायन-कोळीवाडा मतदारसंघात ३0 जूनपर्यंत २ लाख ५१ हजार ३४३ मतदारांची नोंद झाली होती. मात्र १६ सप्टेंबरपर्यंत मतदार यादीतील नोंदणीचा अखेरचा दिवस असल्याने या दिवसापर्यंत नव्या मतदारांनी नोंदणी केली. यामुळे मतदार यादीत आणखी नवीन २ हजार ८२0 मतदारांची नोंद झाल्याचे साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एम. एल. संख्ये यांनी सांगितले. एकूण मतदारांची संख्या २ लाख ५४ हजार १६३ पर्यंत पोहोचली आहे. यात पुरुष मतदारांची संख्या १ हजार ५३७ आणि महिला मतदारांची संख्या १ हजार २८३ ने वाढली आहे. (प्रतिनिधी)