कल्याण समितीच्या बडदास्तीसाठी धावाधाव
By Admin | Updated: April 19, 2017 00:09 IST2017-04-19T00:09:54+5:302017-04-19T00:09:54+5:30
महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचा पालघर जिल्ह्याचा दौरा उद्यापासून २१ एप्रिल पर्यंत आयोजित करण्यात आला आहे

कल्याण समितीच्या बडदास्तीसाठी धावाधाव
हितेन नाईक, पालघर
महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचा पालघर जिल्ह्याचा दौरा उद्यापासून २१ एप्रिल पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. ह्या दौऱ्यातुन सूर्याच्या प्रकल्पाचा वाया गेलेला खर्च, अनेक रस्त्यांचा गिळंकृत करण्यात आलेला निधी, आश्रमशाळामधील भीषण वास्तव उघडे पडण्याची शक्यता पाहता ह्या समितीची बडदास्त राखण्यासाठी अनेक विभाग काही दिवसांपासून कामाला लागल्याचे दिसून येत आहे
विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचा पालघर जिल्हा दौऱ्याला उद्यापासून सुरु होत असून ही समिती जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग, महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद यांच्याकडील अनुसूचित जमातीविषयक विषय तसेच निधीचा विनियोग, आस्थापना बाबी यांचा आढावा घेणार आहे. ही समिती शासकीय व अनुदानित आश्रमशाळा,वसतीगृह तसेच विविध योजनांची कामे चालू आहेत त्याठिकाणी भेटी देणार आहे.
पालघर जिल्ह्यात ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत अनेक रस्त्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून अनेक विकास कामांचा निधी गिळंकृत करण्यात आल्याचा बाबी समोर आल्या आहेत.ह्या प्रकरणी खोटी बिलेही काढण्यात आली असून जिल्ह्यातील अनेक आश्रम शाळातील निकृष्ट अन्न, सोयीसुविधा ई. बाबत आजही सकारात्मक बदल झालेले नाहीत. हे वास्तव चित्र मात्र आश्रम शाळांना सुट्टी असल्यामुळे समितीच्या निदर्शनास येणार नाहीत.
सूर्याच्या प्रकल्पासाठी खर्च करण्यात आलेला कोट्यवधी रु पयांचा खर्च वाया गेला असून पालघर, डहाणू, जव्हार तालुक्यातील १४ हजार ६९६ हेक्टर जमिनी पैकी निम्याहून म्हणजेच ७ हजार ६८१ हेक्टर क्षेत्र सिंचना बाहेर जाऊन त्या क्षेत्राला पाणी उपलब्ध न झाल्याने हे क्षेत्र नापीक राहणार आहे. बेकायदेशीर रित्या हे पाणी इतर तालुक्याकडे वळविण्यात शेतकरी उध्वस्त होणार आहे.
या समितीत आमदार रु पेश म्हात्रे, डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, नारायण कुचे, पास्कल धनारे, प्रभुदास भिलावेकर, संजय पुराम, प्रा.चंद्रकांत सोनवणे, काशीराम पावरा, वैभव पिचड, पांडुरंग बरोरा, गोपीकिशन बाजोरिया, आनंद ठाकूर, निरंजन डावखरे, चंद्रकांत रघुवंशी, ना.रा.थिटे, पवन म्हात्रे, सं.ल.कांबळे, ए.बी. रहाटे व दोन राखीव असे २१ विधिमंडळ सदस्य ह्या भागांचा दौरा करणार आहेत.आपली बिंग बाहेर येऊन आपल्यावर कारवाईचा बडगा उचलला जाऊ नये म्हणून अनेक खात्याचे अधिकारी ह्या समितीची बडदास्तीची तयारी सुरु आहे.
शुक्रवारी कार्यवाही व आढावा बैठक : दि.२१ एप्रिल २०१७ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वा. डहाणू व जव्हार प्रकल्प कार्यालयातंर्गत येत असलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतीगृह तसेच शासनाच्या व जिल्हा परिषद यंत्रणांकडून राबविण्यात आलेल्या योजनांच्या कामांना भेटी व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करणार आहेत. तर दुपारी ३ ते ५ दरम्यान डहाणू येथे आढावा बैठकीत समितीने जिल्हयातील आदिवासी आश्रमशाळा, वस्तीगृह, शासनाच्या व जिल्हा परिषद यंत्रणाकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात आलेल्या योजनांच्या कामांना दिलेल्या भेटीच्यावेळी आढळून आलेल्या त्रुटीसंदर्भात करावयाची कार्यवाही तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हापरिषद, महानगरपालिका कार्यालय, सर्व नगरपालिका या कार्यालयात झालेल्या बैठकीच्यावेळी उपस्थित झालेल्या मुद्यांच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही व सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक व चर्चा करण्यात येणार आहे.