वृद्धेला मारहाण करून दागिन्यांची लूट
By Admin | Updated: August 24, 2015 23:27 IST2015-08-24T23:27:56+5:302015-08-24T23:27:56+5:30
पालघर-माहीम रोडवरील एका फलॅटमध्ये राहणाऱ्या एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेत रविवारी दुपारी ३ वा. एका अज्ञात चोरट्याने तिला मारहाण करीत

वृद्धेला मारहाण करून दागिन्यांची लूट
पालघर : पालघर-माहीम रोडवरील एका फलॅटमध्ये राहणाऱ्या एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेत रविवारी दुपारी ३ वा. एका अज्ञात चोरट्याने तिला मारहाण करीत तिच्या अंगावरील सुमारे ७५ हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.
पालघर जिल्हा परिषदेमध्ये कार्यालयीन अधीक्षकपदी कार्यरत असलेले दीनानाथ पाटील हे आपली आई, पत्नी व मुलासह पालघर-माहीम रोडवरील कंचनपुष्प रहिवासी संकुलमध्ये राहतात. शनिवारी ते रत्नागिरी येथे मेकॅनिकल इंजिनीअरच्या शिक्षणासाठी राहत असलेल्या सौरभला भेटण्यासाठी गेले होते, तर त्यांची पत्नी दीप्ती ही माहेरी सफाळे येथे गेली होती. दुपारी त्यांचा मुलगा भाविक व अन्य तीन लहान मुली खेळण्यासाठी इमारतीखाली गेल्या होत्या.
दुपारी ३ वा.च्या सुमारास दरवाजात उभ्या असलेल्या चोरट्याने आपण महावितरणकडून आलो असून इलेक्ट्रीक बिल द्यायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे लक्ष्मी पाटील (७५) यांनी दरवाजा उघडताच त्या अज्ञात चोरट्याने त्या वृद्ध महिलेला जोरात ढकलून देत त्यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांना जखमी केले. कपाटाच्या चाव्यांची मागणी करून त्याने सर्व कपाट तपासले. मात्र, हाती काहीही लागले नाही. शेवटी, त्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा गोफ व हातांतील सोन्याच्या बांगड्या हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रताप भोस यांनी घटनास्थळी भेट दिली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)