जव्हारमध्ये रोडरोमिओंचा उच्छाद
By Admin | Updated: August 26, 2015 23:46 IST2015-08-26T23:46:02+5:302015-08-26T23:46:02+5:30
जव्हार शहरात सध्या रोडरोमिओंच्या उच्छादामुळे शाळा तसेच कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण असून पालकवर्ग चिंतेत आहे. शहरात भारती विद्यापीठ

जव्हारमध्ये रोडरोमिओंचा उच्छाद
जव्हार : जव्हार शहरात सध्या रोडरोमिओंच्या उच्छादामुळे शाळा तसेच कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण असून पालकवर्ग चिंतेत आहे. शहरात भारती विद्यापीठ व गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. यामध्ये शहरातील तसेच ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. या प्रकाराकडे पोलीस लक्ष देत नसल्याने विद्यार्थिनी शाळा तसेच कॉलेज सोडण्याच्या मन:स्थितीत आहे. या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.
शाळा तसेच कॉलेज भरण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेस हे रोडरोमिओ टोळक्याने मोटारसायकलवर तोंडाला रूमाल बांधून घिरट्या घालतात. विरळ लोकवस्ती असलेल्या ठिकाणी, पानटपऱ्यांवर, चौकात उभेच असतात. विद्यार्थिनी येताच शेरेबाजी करणे, शिट्या मारणे, अश्लील गाणे म्हणणे असे प्रकार करतात. अनेक विद्यार्थिनी भीतीने पालकांना या गोष्टी सांगत नाहीत. ज्या सांगतात, त्यांचे पालक बदनामी नको म्हणून पोलीस स्टेशनची पायरी चढत नाहीत. याचाच गैरफायदा हे रोडरोमिओ घेतात. हे सर्व प्रकार शाळा व कॉलेजच्या कॅम्पसबाहेर घडत असल्याने तेथील प्राचार्य, प्राध्यापक यांना याबाबत काहीही कारवाई करता येत नाही.
शहरातीलच एका विद्यार्थिनीने छेडछाडीच्या प्रकरणामुळे शाळेत जाणे सोडून दिले. तसेच तिने वार्षिक परीक्षादेखील न दिल्याने तिच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण, असा सवाल तिच्या पालकांनी केला. आजदेखील अनेक विद्यार्थिनी शाळेत जाण्यास घाबरत असल्याने त्यांचे वडील त्यांना शाळेत सोडण्यासाठी व आणण्यासाठी जातात. याबाबत, छेडछाड करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलताच गावातीलच अनेक राजकीय पक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे रोडरोमिओंना पाठीशी घालण्याचे व त्यांना सोडून द्या, प्रकरण आपापसांत मिटवून टाकण्याचे धोरण असल्याने या रोडरोमिओंना धाक राहिला नसून ते निर्ढावल्याचे पालकांनी सांगितले.
छेडछाडीच्या अनेक तक्रारी पालकांनी तोंडी केल्या आहेत. त्या-त्या वेळी आम्ही तत्काळ दखल घेतली. आता या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी दोन महिला व दोन पुरुष पोलिसांचे स्क्वॉड तयार करून विद्यार्थिनी तसेच महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर पाळत ठेवून कडक कारवाई करू.- केशवराव नाईक, पोलीस निरीक्षक, जव्हार