समुद्रात बोटी अडवून पोलिसांकडूनच लूट?
By Admin | Updated: January 24, 2016 00:10 IST2016-01-24T00:10:08+5:302016-01-24T00:10:08+5:30
समुद्रात मासेमारी करीत असताना गस्तीवरील पोलीस मच्छीमारांच्या बोटी अडवून त्यांच्याकडून मासे जबरदस्तीने नेत असल्याच्या घटना वाढल्या असून त्यावर कारवाई करावी, अन्यथा सागरी

समुद्रात बोटी अडवून पोलिसांकडूनच लूट?
वसई : समुद्रात मासेमारी करीत असताना गस्तीवरील पोलीस मच्छीमारांच्या बोटी अडवून त्यांच्याकडून मासे जबरदस्तीने नेत असल्याच्या घटना वाढल्या असून त्यावर कारवाई करावी, अन्यथा सागरी सुरक्षेसाठी मच्छीमार पोलिसांना सहकार्य करणार नाही, असा इशारा कोळी युवाशक्तीचे अध्यक्ष दिलीप माठक यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी गस्त घालणाऱ्या पोलिसांनी वसईजवळील पोशापीर येथे धनराज ही मासेमारी बोट अडवून खलाशी जोनास अप्पा यांना दमदाटी करून मासे काढून घेतले. या वेळी विरोध केला असता गस्ती बोटीवरील पोलिसांनी दमदाटी केल्याचा आरोप जोनास यांनी केला आहे.
वसई पाचूबंदर समुद्रात बेकायदेशीरपणे रेतीउत्खनन सुरू आहे. त्या बोटींकडे तसेच मजुरांकडे कोणतीही ओळखपत्रे नसतात. त्यांना अभय देणारे पोलीस गरीब मच्छीमार गस्तीवरील पोलिसांची तक्रार करीत असल्याने मच्छीमारांकडे कागदपत्रांची चौकशी करून त्रास देत असतात, अशीही तक्रार आहे. पोलिसांकडून सुुरू असलेला छळ थांबला नाही तर यापुढे सागरी सुरक्षे संदर्भात कुठल्याही प्रकारचे सहकार्य केले जाणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी)