जलस्वराज घोटाळ्याचा अहवाल मंत्र्यांकडे, कारवाई होणार?
By Admin | Updated: March 10, 2016 01:46 IST2016-03-10T01:46:00+5:302016-03-10T01:46:00+5:30
सुमारे दहा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यात राबविलेल्या जलस्वराज योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीचा अहवाल पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे सुपूर्द केला

जलस्वराज घोटाळ्याचा अहवाल मंत्र्यांकडे, कारवाई होणार?
सुरेश लोखंडे, ठाणे
सुमारे दहा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यात राबविलेल्या जलस्वराज योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीचा अहवाल पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे सुपूर्द केला गेला असून त्यातील दोषींवर ते काय कारवाई करतात, याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे. हा भ्रष्टाचार लोकमतने वेळोवेळी उघडकीस आणला होता.
तत्कालीन ठाणे जिल्ह्यात सुमारे एक हजार ५६४ नळपाणीपुरवठा योजना जलस्वराज्य योजनेव्दारे हाती घेण्यात आल्या होत्या. जिल्हा विभाजनानंतर आता या योजनांचे वर्गीकरण केले असता सध्याच्या ठाणे जिल्ह्यातील ६२२ योजना व पालघर जिल्ह्यातील सुमारे ९४२ योजनांमध्ये हा भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त लोकमतने या आधीच प्रसिध्द केले आहे. यामध्ये पालघरच्या ८३८ योजना व ठाण्याच्या ४७८ योजनांची तपासणी कोकण विभागीय आयुक्तांद्वारे होऊन मंत्र्याना तो अहवाल सूपूर्द केला आहे. त्यातील दोषी अधिकारी, अभियंते, ग्रामसेवक, सरपंच आणि पाणीपुरवठा समितीचे पदाधिकारी यांच्यावर आता मंत्री काय कारवाई करतात, याकडे या दोन्ही जिल्ह्यातील गावपाड्यांचे लक्ष लागून आहे.
ठाणे जिल्हा परिषदेने या नळपाणीपुरवठा योजनांमधील संबंधीत ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यातील काही पदाधिकाऱ्यांनी अपहार केलेल्या रकमेचा भरणा केला तर काहींवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली.
पण समिती पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात मोठमोठ्या रकमांचे अपहार केल्याचे संबंधीत अधिकारी, अभियंत्यांकडून सांगितले जाते. या महाभागांनी योजनेच्या कामाची प्रगती पाहून निधी दिला असता तर हा घोटाळा झालाच नसता. तीन टप्यात हा निधी द्यायचा होता. कामांच्या प्रगतीवर पहिल्या टप्यातील निधी देणे अपेक्षित होते. परंतु यानियमाचे पालन झालेच नाही.