विरारच्या आयर्नमॅन हार्दिक पाटलांच्या नावे विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2025 10:33 IST2025-01-08T10:32:48+5:302025-01-08T10:33:28+5:30
२०२४ मध्ये तब्बल १० पूर्ण आयर्नमॅन, १ अर्ध आयर्नमॅन, १ अल्ट्रामॅन तर २ वर्ल्ड मेजर मॅरेथॉनचा साहसी विक्रम नोंद

विरारच्या आयर्नमॅन हार्दिक पाटलांच्या नावे विक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरारचा आयर्नमॅन अशी ओळख असलेल्या हार्दिक पाटील याने आता आपल्या नावावर आणखी काही नव्या विक्रमांची नोंद केलेली आहे. यापूर्वी अनेक अर्ध व पुर्ण आयर्नमॅन स्पर्धा तसेच अल्ट्रामॅन, वर्ल्ड मेजर मॅरेथॉन स्पर्धा देश विदेशात जाऊन हार्दिक पाटील यांनी यशस्वीरित्या सफल केल्या आहेत. त्यांच्या विक्रमी नोंदींमध्ये आणखी काही महत्वपूर्ण व विक्रमी स्पर्धेंची व त्या स्पर्धा ठराविक वेळेत यशस्वीरित्या पूर्ण करण्याची भर पडलेली आहे.
हार्दिक पाटील यांनी नुकताच फेब्रुवारी २०२४ मध्येच 'फ्लोरिडा २०२४अल्ट्रामॅन' हि स्पर्धा सलग तीन दिवसांत अमेरिकेतील 'फ्लोरिडा' याठिकाणी सातासमुद्रापार परदेशात पुर्ण करत देशाचे तसेच महाराष्ट्राचे नाव जग पातळीवर उंचावले होते आणि भारताचा झेंडा अटकेपार फडकवला होता; त्यानंतर आता एका वर्षभरातच १० फुल आयर्नमॅन स्पर्धा जर्मनी, फिलिपिन्स, ऑस्ट्रिया, ॲस्टोनिया, स्वीडन, जपान, स्पेन, अमेरिका, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये जाऊन तर भारतातील गोवा येथे १ अर्ध आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत.
त्याच बरोबरीने जपान आणि जर्मनी ह्या देशांमध्ये ह्याचवर्षी 'वर्ल्ड मेजर मॅरेथॉन' स्पर्धा पूर्ण करण्याचा विक्रमसुध्दा हार्दिक पाटलांनी केलेला आहे. शिवाय जगभरात झालेल्या फुल आयर्नमॅन स्पर्धा ३५ वेळा पूर्ण करणारा दुसरा भारतीय तर हाफ आयर्नमॅन स्पर्धा २१ वेळा पूर्ण करणारा प्रथम भारतीय ह्या साहसी विक्रमांची नोंद देखील हार्दिक पाटील यांनी आपल्या नावे जमा केली आहे. हार्दिक पाटील यांच्या कामगिरीचं सर्व स्तरावरून कौतुक केलं जात आहे. यापूर्वीदेखील अनेक साहसी, विक्रमी नोंदी त्यांच्या नावे आहेत.
फुल आयर्नमॅन ही वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन (डब्ल्यूटीसी) द्वारे आयोजित ट्रायथलॉन रेस आहे. यात ४ किमी पोहणे, १८०.२ किमी सायकल चालवणे आणि ४२.२ किमी धावणे यांचा समावेश असतो. या तिन्ही शर्यती क्रमाने आणि ब्रेकशिवाय पूर्ण करायच्या असतात. १७ तासांच्या कालावधीत ही आव्हानं सर करावी लागतात. ही स्पर्धा आर्थिक दृष्ट्या महाग असल्याने सर्वसामान्य खेळाडूला या स्पर्धेचं चॅलेंज स्वीकारणे आर्थिक अडचणींमुळे शक्य होत नाही, परंतु 'मी लवकरच भारतासह पालघर जिल्ह्यातील इच्छुक स्पर्धकांना यात सामाहून घेत, स्पर्धेकडे वळवण्याचा प्रयत्न करणार आहे', अशी माहितीही त्यांनी दिली. येणाऱ्या काळामध्ये पालघर, ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी चांगलं व्यासपीठ म्हणून स्पोर्ट क्लब देखील उघडणार असल्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले आहे.