दुरुस्तीअभावी रावढळ पुलाला तडे
By Admin | Updated: December 25, 2014 22:14 IST2014-12-25T22:14:27+5:302014-12-25T22:14:53+5:30
म्हाप्रळ - पंढरपूर राज्यमार्गावरील रावढळ गावाजवळ असलेल्या नागेश्वरी नदीवरील पूल जीर्ण झाला आहे. पुलाच्या बांधकामाला तडे गेले

दुरुस्तीअभावी रावढळ पुलाला तडे
दासगाव : म्हाप्रळ - पंढरपूर राज्यमार्गावरील रावढळ गावाजवळ असलेल्या नागेश्वरी नदीवरील पूल जीर्ण झाला आहे. पुलाच्या बांधकामाला तडे गेले आहे तर अनेक ठिकाणी पुलाचे कपचे उडाल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. यामुळे या पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिक व वाहनचालक करीत आहेत.
म्हाप्रळ-पंढरपूर राज्यमार्गाचे काम झाले तेव्हा रावढळ गावाजवळ पूल बांधण्यात आला. येथील खाडीतील रसायनयुक्त खारे पाणी, पावसाळ्यात नागेश्वरी नदीला येणाऱ्या पुराचे पाणी आणि डोंगरातून वाहत येणाऱ्या नागेश्वरी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग यामुळे हा पूल आता जीर्ण होत चालला आहे. अनेक ठिकाणी पुलाला तडे गेले आहेत. पुलाच्या खांबांचे कपचे उडाले आहेत. या नादुरुस्तीमुळे आर.सी.सी. पद्धतीच्या या खांबातील लोखंडी सळ्या गंजण्याचे प्रमाण वाढले आहे.
म्हाप्रळ-पंढरपूर हा मार्ग कोकण आणि घाटाला जोडणारा मार्ग आहे. महाडच्या खाडी पट्ट्यातील ग्रामस्थ महाडमध्ये येण्यासाठी याच मार्गाचा प्रामुख्याने वापर करतात. त्यामुळे हा मार्गावर कायम वाहनांची वर्दळ असते. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वीट आणि वाळू वाहतूक होत असल्याने अवजड वाहनांचीही कायम वर्दळ असते. या पुलावरुन पावसाळ्यात नदीच्या पुराचे पाणी देखील जाते. यामुळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प होते.
महाड-म्हाप्रळ मार्ग ज्यावेळी झाला त्यावेळी या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. तिथपासून आजतागायत या पुलाची मोठी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. काळाच्या ओघात हा पूल आता जीर्ण होत चालला असून तो धोकादायक बनत आहे. (वार्ताहर)