विसर्जनासाठी पाऊसफुले

By Admin | Updated: September 22, 2015 03:37 IST2015-09-22T03:37:01+5:302015-09-22T03:37:01+5:30

पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत गौरी-गणपतीचे विसर्जन उत्साहात पार पडले. दुपारी २ नंतर भक्तांनी आपल्या मूर्ती विसर्जनासाठी नेण्यास सुरुवात केली

Rainstorms for immersion | विसर्जनासाठी पाऊसफुले

विसर्जनासाठी पाऊसफुले

पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत गौरी-गणपतीचे विसर्जन उत्साहात पार पडले. दुपारी २ नंतर भक्तांनी आपल्या मूर्ती विसर्जनासाठी नेण्यास सुरुवात केली. सोमवारी विसर्जनाच्या वेळेस पावसानेही हजेरी लावली. मात्र, कोणतेही अडथळे निर्माण झाले नाहीत. वसई, पालघर, डहाणू, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा व तलासरी या आठ तालुक्यांत पोलीस व स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी योग्य ती यंत्रणा उभी केली. त्यामुळे विसर्जन सुरळीत पार पडले. समुद्रकिनारी असलेल्या गावांमध्येही अनेक गणपती तसेच गौरींचे विसर्जन करण्यात आले. या वेळी प्रशासनातर्फे विसर्जनाच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवले होते. सायंकाळी उशिरापर्यंत कोणतीही अप्रिय घटना घडली नसल्याचे विविध पोलीस ठाण्यांतर्फे सांगण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा घोषणांमध्ये गणपतीने आपल्या भक्तांचा निरोप घेतला.

वसई : वसई-विरार परिसरातील गौरी-गणपतींचे विसर्जन शांततेत पार पडले. दोन दिवसांपूर्वी आलेल्या गौराईच्या वास्तव्यानंतर सोमवारी दुपारनंतर अनेक भाविकांनी विसर्जनास सुरुवात केली. दिवसभरात कोणतीही अप्रिय घटना घडली नसल्याचे विविध पोलीस ठाण्यांतर्फे सांगण्यात आले.
दुपारी ३ वाजल्यानंतर अनेक भाविकांनी आपल्या मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढल्या. बॅण्ड, डीजे, लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात बाप्पाला गौरीसह निरोप देण्यात आला. विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकांमध्ये लहान मुलांसह अबालवृद्धही सहभागी झाले.
शहरी भागातील तलावांमध्ये विसर्जन सोहळा पार पडला. प्रत्येक तलावाच्या ठिकाणी मनपा प्रशासनाने स्टेज उभारले होते. तसेच विसर्जन करण्यासाठी तरुणांचे पथक तैनात होते. वसई, नालासोपारा, विरार तसेच वसई रोड या ४ शहरांसमवेत ग्रामीण भागात एकूण साडेपाच हजार गणपतींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनावेळी बाप्पाला निरोप देताना भक्तांना फारच क्लेश होत होते.
रात्री उशिरापर्यंत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणांमध्ये मिरवणुका विसर्जनस्थळी येत होत्या. मनपाचे अधिकारी व्यवस्थेवर नियंत्रणाचे काम करीत होते. तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक व स्थानिक पोलिसांनी परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली होती. त्यामुळे विसर्जनाच्या मिरवणुकीचा स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास झाला नाही. (प्रतिनिधी)

वसई परिसरात गणरायाला भावपूर्ण निरोप; गौराईमाताही सासरी
४पारोळ : वसई, विरार परिसरात पाच दिवसाच्या सार्वजनिक तसेच घरगुती गणरायाला भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. तसेच सोनपावलांनी माहेरी आलेल्या व अडीच दिवसाचा माहेरचा पाहुणचार घेत गौरी देखील सासरी रवाना झाल्या. वसई ग्रामीण भागात नदी, ओहळ, विहिरीवर पाच दिवसाच्या गणरायाचे विसर्जन केले.
४पारंपारीक पद्धतीने टाळमृदूंगाच्या मंजुळ स्वरानी बाप्पांना निरोप दिला. तसेच निसर्गाचे रूपात आलेली गौरी मातेचे घरातील सुवासींनींनी आपल्या शेतावर विसर्जन केले. यावेळी विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विसर्जनासाठी गर्दी होईल अशा स्थळांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मनोर परिसरात १९८ गणपती, ९७ गौरींचे विसर्जन
मनोर : मनोर परिसरातील पाच दिवसाचे श्री गणेश आणि गौरींचे वैतरणा, सुर्या, देहरजा, हातनदी, तानसा नद्यांच्या गणेश कुंडात वाजत गाजत मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.
मनोर परिसरातील टेण, सावरखंड, मासवण, नागझरी, किराट, लालोंडे, ढेकाळी, नावझे, करळगाव, अशा अनेक गावातील सार्वजनिक मंडळाचे ५६, घरगुती १४२ बाप्पांचे, तर ४५ घरगुती २५ सार्वजनिक गौरींचे सोमवारी पारंपारीक पद्धतीने वाजत गाजत भजन, किर्तनाच्या गजराने मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.
मनोर पोलीस ठाण्याचे सहा. पो. नि. मारोती पाटील व उपविभागीय पोलीस अधिक्षक जयंत बजबळे यांनी सर्व गावामध्ये चोख बंदोबस्त तैनात केले होते. कुठेही अनुचित प्रकार घडले नाही.
मनोर परिसरातील सर्वत्र ठिकाणातील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे गौरी गणपतीची मिरवणूक काढताना त्या खड्ड्यातुन मार्ग काढावे लागले. त्यामुळे नागरीकांकडून सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधीत ग्रामपंचायत विरोधात संताप होता. (वार्ताहर)

Web Title: Rainstorms for immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.