पावसाने फिरवले ५०० कोटी रुपयांवर पाणी
By Admin | Updated: June 20, 2015 12:58 IST2015-06-20T12:58:50+5:302015-06-20T12:58:50+5:30
शुक्रवारच्या पावसानं नुसतं मुंबईचं जीवनमान ठप्प केलं नाही तर दुकानदारांचं सुमारे ५०० कोटी रुपयांचं नुकसान केलं असा अंदाज या क्षेत्रातल्या जाणकारांनी व्यक्त केला

पावसाने फिरवले ५०० कोटी रुपयांवर पाणी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - शुक्रवारच्या पावसानं नुसतं मुंबईचं जीवनमान ठप्प केलं नाही तर दुकानदारांचं सुमारे ५०० कोटी रुपयांचं नुकसान केलं असा अंदाज या क्षेत्रातल्या जाणकारांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये सुमारे ३.५ लाख दुकाने असून त्यातील जवळपास ८० टक्के दुकाने शुक्रवारी बंद ठेवावी लागली होती.
फेरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांच्या सांगण्यानुसार रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे बहुतेक दुकानांमधील कर्मचारी कामावर आले नाहीत, तसेच रस्ते ओस पडले होते आणि ग्राहकही फिरकत नव्हते. मुंबईमध्ये सुमारे ३.५ लाख दुकाने असून दिवसाला प्रत्येक दुकानाचे सरासरी उत्पन्न १० ते १५ हजार रुपयांचे आहे. त्यामुळे अंदाजे मुंबईकर दुकानदारांचे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही दुकानांचे उत्पन्न दिवसाला लाखात आहे तर काहींचे हजारात आहे, परंतु सरासरी १० ते १५ हजार रुपयांचे उत्पन्न आहे असे ते म्हणाले.
दुकानांमध्ये पाणी शिरुन अनेक ठिकाणी मालाचे नुकसानही झाले आहे, परंतु त्याची आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही त्यामुळे ते नुकसान वेगळेच आहे. दुकानांपाठोपाठ दुसरा मोठा धक्का हॉटेलांना बसला आहे. उपनगरांमधले चाकरमानी शहरात आलेच नाहीत त्यामुळे बहुतेक हॉटेल व रेस्टॉरंट ओस पडलेली होती असे आहारच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष निरंजन शेट्टी यांनी सांगितले. मुंबईतल्या प्रत्येक हॉटेलला हा फटका बसल्याचे शेट्टी म्हणाले.