वसई-विरार परिसरातील रुग्णालयांच्या ‘फायर ऑडिट’बाबत उपस्थित झाले प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 23:40 IST2021-04-23T23:39:57+5:302021-04-23T23:40:15+5:30
महापालिका म्हणते ऑडिट झालेय : शहरातील रुग्णालयांची आकडेवारी नाही

वसई-विरार परिसरातील रुग्णालयांच्या ‘फायर ऑडिट’बाबत उपस्थित झाले प्रश्न
-आशिष राणे
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसई-विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले असल्याची माहिती एका वाक्यात महापालिका अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांनी माध्यमांना दिली. मात्र, याबाबत प्रत्यक्षात अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप पालव यांना विचारले असते असता मी बैठकीत व्यस्त आहे, नंतर बोलतो, असे ‘लोकमत’ला सांगितले.
शहरातील किती हॉस्पिटल व आरोग्य केंद्रांचे फायर ऑडिट झाले? असे नागरिक, पत्रकार व विरोधकांच्या प्रश्नांचा भडिमार चुकवण्यासाठी त्यांनी शुक्रवारी दुपारपासून मोबाइलही बंद ठेवला आहे. मुळातच वसई-विरार शहरातील किती रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण झाले? व किती रुग्णालयांचे शिल्लक आहे, हा गंभीर प्रश्न विजय वल्लभ रुग्णालयाच्या गंभीर घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, स्थानिक पातळीवर व मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, विरोधकांनी सुद्धा फायर ऑडिटबाबतीत प्रश्न उपस्थित केले असून पालकमंत्री व नगरविकासमंत्री यांच्या आढावा बैठकीत पालिका हद्दीतील रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले आहे का? सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट व त्यांची तपासणी करण्याचे आदेशच देण्यात आले आहेत. मग विजय वल्लभ रुग्णालयाचे फायर ऑडिट खरोखरच झाले आहे का? आणि कधी झाले? सोबत शहरातील किती रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले? असे प्रश्न मात्र आजच्या घटनेने अधोरेखित झाले आहेत. दरम्यान, अग्निशमन दल विभागप्रमुख दिलीप पालव यांनी मनपाच्या हद्दीतील सर्वच रुग्णालयातील फायर ऑडिट संबंधित सविस्तर माहिती आकडेवारीसह माध्यमांकडे स्पष्ट करणे बंधनकारक आहे. मात्र, ती अजूनही दिली नसल्याने संशय अधिक बळावतो आहे.
कुठेतरी पाणी मुरतेय
मनपाच्या हद्दीतील रुग्णालयांच्या फायर ऑडिटसंबंधी सविस्तर माहिती आकडेवारीसह माध्यमांकडे स्पष्ट करणे आवश्यक आहे. मात्र, ती दिली नसल्याने संशय अधिक बळावत आहे. यामुळेच विजय वल्लभ रुग्णालयाच्या फायर ऑडिटसंदर्भात पाणी मुरत असल्याची टीका होत आहे.