सीमा भागातील प्रश्न जैसे थे, पिडीत खलाशांचे कुटुंब आजही वा-यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:20 IST2017-11-08T01:20:23+5:302017-11-08T01:20:33+5:30
एकीकडे पालघर जिल्हा मुख्यालयाचा भूमिपूजन समारंभ सोहळा बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ घातला आहे. तर दुसरीकडे या जिल्ह्याच्या सीमा भागात निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यात प्रशासन

सीमा भागातील प्रश्न जैसे थे, पिडीत खलाशांचे कुटुंब आजही वा-यावर
अनिरुद्ध पाटील
डहाणू : एकीकडे पालघर जिल्हा मुख्यालयाचा भूमिपूजन समारंभ सोहळा बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ घातला आहे. तर दुसरीकडे या जिल्ह्याच्या सीमा भागात निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने नागरिकांना या सोहळ्याबद्दल कौतुक नसल्याचे चित्र आहे.
पालघर जिल्ह्याच्या उत्तरेस महाराष्ट्र गुजरात सीमा भागात डहाणू आण ितलासरी तालुका वसला आहे. येथे रोजगार संधीच्या मर्यादेमुळे आदिवासी युवक वर्षातील आठ महिन्यांसाठी स्थलांतरित होत आहे. गुजरात राज्यातील मासेमारी बंदरात खलाशी म्हणून काम करताना बोट बुडून होणाºया अपघातामुळे अनेकांना जीवास मुकावे लागले आहे. मात्र सीमेपलीकडील नियमांचा हवाला देऊन पिडीत कुटुंबीयांना मोबदल्यापासून वंचित ठेवले जात असल्याने दैनावस्था सहन करावी लागते आहे. आजही बहुतांश खलाशी बायोमॅट्रिक कार्डपासून वंचित आहेत.
आश्रमशाळांची स्थिती बाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केला जातो. ३० आॅक्टोबर रोजी अस्वाली येथील आश्रमशाळेत तांदूळ नसल्याची बाब स्थानिकाच्या चौकसनजरेने हेरली आणि हे प्रकरण बाहेर पडल्याने अधीक्षक, मुख्याध्यापकांना धावपळ करून धान्याची तजवीज करावी लागली. अन्यथा निवासी ३०० विद्यार्थ्यांना अर्धेपोटी किंवा उपाशीच राहण्याची वेळ आली होती. त्यामुळे येथील धान्य पुरवठा आणि अन्नाचा दर्जा या बाबत चौकशी नेमण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आण िआदिवासी विकासमंत्री या प्रकरणी चौकशी लावतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बोर्डी विजयस्तंभापासून या आश्रमशाळेपर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. हा परिसर डॅमनजीक आणि पश्चिम घाटालगत असल्याने जंगलाने वेढला आहे. परंतु येथे संरक्षक भिंत नसल्याने वन्य प्राण्यांपासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. येथील नव्या वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात असून त्यासाठी दिवसाढवळ्या वीज चोरी केली जात आहे.
बोर्डी, घोलवड, झाई या मोजक्या ग्रामपंचायती वगळता अन्य गावं पाणी पुरवठा योजनेपासून वंचित आहे. त्यामुळे हगणदारी मुक्तीचा वसा घेतलेल्या नागरिकांना पाण्याविना शौचालयात कसे जावे ही चिंता सतावते आहे. शौचालायचे बांधकाम करून दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी अनुदानाची रक्कम खात्यात जमा झालेली नाही. घोलवड गावातील पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून चौकशीची मागणी केली आहे. परंतु याबाबत चालढकल केली जात असल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे.