पाणेरीप्रश्नी ‘आधी मोर्चा, मग चर्चा!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 23:30 IST2020-02-13T23:29:26+5:302020-02-13T23:30:33+5:30

ग्रामस्थ आक्रमक : १७ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

'Question first, then talk!' | पाणेरीप्रश्नी ‘आधी मोर्चा, मग चर्चा!’

पाणेरीप्रश्नी ‘आधी मोर्चा, मग चर्चा!’

पालघर : आपल्या गावाच्या आरोग्यासाठी, भवितव्यासाठी माहीमवासीय पुन्हा एकदा एकत्र झाले असून पाणेरी नदी वाचविण्याच्या चर्चा, निवेदने, बैठका आता खूप झाल्या असून तीव्र आंदोलन उभारून जिल्हा प्रशासनाला थेट भिडण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. जिल्ह्यात वाढत्या प्रदूषणामुळे कॅन्सर आदी आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असतानाही जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाईचे अस्त्र उगरले जात नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देण्याचा निर्णय घेतला आहे.


पालघर जिल्हा प्रदूषणामध्ये एक नंबरवर असून एकामागे एक कारखान्यांमध्ये आगीच्या घटना घडत असून कामगारांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ होत आहे, तर दुसरीकडे कारखान्यांतील घातक रसायन नदी-नाल्यांत सोडले जात असताना आता तेच पाणी नागरिकांना पुरवठा करणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्याच्या (धरण क्षेत्रात) आसपास टाकून नागरिकांच्या जीवनाशी जीवघेणा खेळ खेळण्याची हिंमत काही कारखानदार करू लागले आहेत. काही पैसे वाचविण्याच्या अशा जीवघेण्या कृत्यामुळे औद्योगिक परिसर क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाले असून नागरिकांना अनेक जीवघेण्या आजाराने जखडले आहे.


पालघरच्या बिडको औद्योगिक वसाहतीमधील काही कारखान्यामधून चोरट्या मार्गाने रासायनिक प्रदूषित पाणी आणि पालघर नगर परिषद क्षेत्रातील सांडपाणी पाणेरी नदीत सोडले जात असल्याने आदिवासी, मच्छिमार समाजाचे आणि बागायतदार शेतकऱ्यांची जीवनवाहिनी बनलेली ही नदी गटारगंगा बनली आहे. प्रदूषणकारी कंपन्यांना छुपा पाठिंबा देणाºया काही राजकीय पदाधिकारी, उदासीन जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या घट्ट संबंधामुळे कंपन्यांवर थातूरमातूर कारवाई दाखवीत प्रशासन आपली पाठ थोपवून घेत आहे. अशा काही गोष्टीमुळे माहीमवासीय उभारत असलेल्या लढ्याला अपेक्षित यश मिळत नसल्याने हा लढा अनेक वर्षांपासून सुरूच आहे.


जलपुरुष म्हणून देशात ओळख असलेल्या राजेंद्र सिंह यांच्या सहकार्याने पाणेरीच्या लढ्याल्या आता नव्याने चालना मिळाली असून नव्या रणनीती आखण्यात आलेल्या आहेत. मंगळवारी वडराई मच्छिमार सर्वोदय सहकारी संस्थेच्या आवारात आयोजित केलेल्या जाहीर सभेत १७ फेब्रुवारी हा दिवस मोर्चासाठी निश्चित करण्यात आला आहे. या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. या सभेत सरपंच दीपक करबट, वडराई मच्छिमार संस्थेचे चेअरमन रमेश मेहेर, माहीम वि.का.स. संस्थेचे चेअरमन महेंद्र राऊत, वडराई ताडी संस्थेचे संचालक प्रभाकर गावड, टेंभी मत्स्य व्यावसायिक संस्थेचे चेअरमन जयवंत तांडेल, माहीम आदिवासी खंडकरी संस्थेचे प्रतिनिधी दत्ताराम करबट, शिवसेना तालुका प्रमुख विकास मोरे, सोमवंशीय क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष अजय ठाकूर, मानेंद्र आरेकर, विद्याधर ठाकूर, परशुराम धनू, चिंतामण मेहेर, शंकर नारले, सुजय मोरे आदींनी आपले मत मांडले. सर्वांनीच मोर्चाची आवश्यकता असल्याचे सांगून पूर्ण ताकदीनिशी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.

मच्छीमार समाज एकवटणार
जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी वडराई-माहीममधील सर्व मच्छिमार बोटी बंद ठेवून मच्छिमार समाज आपल्या कुटुंबासह मोर्चात सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. सहा आसनी रिक्षा चालकही या दिवशी रिक्षा बंद ठेवून सहकार्य करणार आहेत.

Web Title: 'Question first, then talk!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.