तोंडात सिमकार्ड टाकून विवाहितेचा दाबला गळा
By Admin | Updated: March 11, 2017 15:39 IST2017-03-11T15:39:31+5:302017-03-11T15:39:31+5:30
विरारमध्ये नवविवाहितेची जाळून हत्त्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच वसई वालीव परिसरात एका 24 वर्षीय विवाहितेची तिच्या सासरच्या मंडळीने क्रूरपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

तोंडात सिमकार्ड टाकून विवाहितेचा दाबला गळा
ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 11 - विरारमध्ये नवविवाहितेची जाळून हत्त्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच वसई वाळीव परिसरात एका 24 वर्षीय विवाहितेची तिच्या सासरच्या मंडळीने क्रूरपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. चारित्र्याच्या संशयातून सासरच्या मंडळींनी विवाहितेची हत्या केली. मृत महिला सतत मोबाइलवर बोलत असते म्हणून मोबाइलचे सिमकार्ड तिच्या तोंडात टाकून तिची गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली. वाळीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून सासू, सासरे, दीर आणि नंदेला अटक केली आहे.
नालासोपारा पूर्वेला पेल्हार गावात महापालिकेच्या कार्यालयासमोर सरिता वर्मा ही आपला पती अभिमन्यू वर्मा (२८ ), सासू शीला वर्मा (४८), सासरे महेश वर्मा (५१ ) आणि दीर भगत वर्मा आणि नणंद रेखा वर्मा (२६) यांच्यासह राहत होती. सरिताचे पती अभिमन्यू यांचे याच ठिकाणी छोटे हॉटेल आहे.
सरिता आणि तिची सासू शीला वर्मा यांचे आपापसात पटत नव्हते. यांच्यात सतत छोट्या छोट्या कारणावरून भांडणे होत असत, शीला आणि इतर सासरची मंडळी सरिताला सतत हुंड्यासाठी त्रास देत असत. सरिता सतत फोन वर बोलत असल्याचे सांगत तिची सासू सरिताला मारहाण करत तिच्या चारित्र्यावरून ही तिचा छळ करत असत अशी माहिती सरिताच्या आईने दिली.
सरिताचा पती अभिमन्यू गावी गेल्यावर तिच्या सासरच्या मंडळीने सरिताचा काटा काढण्याचा कट रचला होता. आणि याच वेळी गावी काही काम निघाल्याने अभिमन्यू गावी गेला. सरिताच्या सासरच्या मंडळीने संधीचा फायदा घेत सरिताची निर्घृण हत्या केली. इतकेच नाही तर आपल्यावर संशय येऊ नये म्हणून तिने गळफास लाऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला. पण पोस्टमोर्टेम रिपोर्टमध्ये सरिताची गळा दाबून आणि डोक्यावर जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे समोर येताच पोलिसांनी सासरच्या मंडळीना बेड्या ठोकल्या.