संदिप वैद्य जव्हारचे नगराध्यक्ष
By Admin | Updated: September 15, 2015 23:03 IST2015-09-15T23:03:05+5:302015-09-15T23:03:05+5:30
जव्हारच्या नगराध्यक्षपदी संदीप वैद्य तर उपनगराध्यक्षपदी आशा बल्लाळ यांची अवघ्या एक मताच्या अधिक्याने आज निवड झाली. वैद्य यांना ९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी गणेश

संदिप वैद्य जव्हारचे नगराध्यक्ष
जव्हार : जव्हारच्या नगराध्यक्षपदी संदीप वैद्य तर उपनगराध्यक्षपदी आशा बल्लाळ यांची अवघ्या एक मताच्या अधिक्याने आज निवड झाली. वैद्य यांना ९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी गणेश रजपूत यांना ८ मते तर आशा बल्लाळ यांना ९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी सेनेच्या अमोल औसरकर यांना ८ मते मिळाली. त्यामुळे सत्ता पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडेच गेली. सार्वत्रिक निवडणुकीनुसार अडीच वर्षाच्या कालावधीनंतर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाकरीता निवडणूक होते. मात्र त्यापूर्वीच नगर पलिकेत राजकीय गदारोळ सुरू झाला आणि काही दिवसांसाठी निवडणुकीची ही प्रक्रिया लांबली होती.
जव्हार नगर परिषदेची निवडणूक ४ नोव्हे. २०१२ मध्ये झाली. नगराध्यक्ष तथा उपाध्यक्षांचा कार्यकाळ जून २०१५ मध्ये संपला. या मध्यस्थीच्या काळात सत्ताधाऱ्यांच्या १४ नगरसेवकांपैकी १० नगरसेवकांनी नवीन गट स्थापन केला. पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला त्याला मान्यता दिली. मात्र, तत्कालीन नगराध्यक्ष रियाज मनियार यांनी त्यांच्यावर नियमबाह्य गट स्थापन केल्याच्या ठपका ठेवत न्यायालयात धाव घेतल्याने पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी या १० नगरसेवकांचे पद रद्द केले, मात्र त्यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णया विरूध्द उच्च न्यायालयात धाव घेतली आणि उच्च न्यायालयाने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिल्याने पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी नियमानुसार या विशेष सभेचे आयोजन करून तिचे पीठासीन अधिकारी म्हणून जव्हार उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती.
काही महिंन्यांपासून नगर पालिकेच्या राजकीय गदारोळामुळे सगळी कामे ठप्प झाली होती, एकही निर्णय मार्गी लागत नव्हता. नगराध्यक्ष पदाची निवडणूक लांबल्याने शासनाने अध्यक्षपदाचा पदभार जव्हारचे तहसीलदार अरूण कनोजे यांच्यावर सोपवला होता. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने मोठे निर्णय घेण्यासाठी अडथडे निर्माण होत होते.
नगर पालिका हे राजकारणाचे सभागृह नाही, आम्ही गावाच्या विकासाठी प्रत्येक क्षण घालवू. पाणी पुरवठा, बेरोजगारी व पर्यटन विकासाकडे लक्ष वेधण्याचे प्रत्यन करू.
- संदिप वैद्य,
नवनिर्वाचित नगराध्यक्ष,
जव्हार नगरपरिषद
राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असली तरी, आमचीही संख्या कमी नाही. विरोधी पक्षात असलो तरी सुध्दा काय करू शकतो हे जव्हारच्या जनतेला दिसेल.
- अमोल औसरकर,
सभापती, सार्व. बांधकाम व दिवाबत्ती समिती,
जव्हार नगर परिषद
मिरवणूकीत राष्ट्रवादीच्या झेंड्यांसोबत बीजेपीचे ही झेंडे फडकविण्यात आले, आम्ही राष्ट्रवादीला कुठलेही सर्मथन दिलेले नाही. ही जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.
- भरत सोनार,
जव्हार तालुका सरचिटणिस, बी.जे.पी.