सावकाराने घेतला गरीब रिक्षाचालकाचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:45 IST2018-06-27T23:43:09+5:302018-06-27T23:45:54+5:30
कर्जापोटी घेतलेले १० हजार रुपये वसूल करण्यासाठी सावकाराने त्याच्या साथीदारामार्फत रिक्षाचालकावर दाबाव आणला. त्याचा मानसिक धक्का बसल्याने रिक्षाचालकाची प्रकृती खालावली.

सावकाराने घेतला गरीब रिक्षाचालकाचा जीव
डोंबिवली : कर्जापोटी घेतलेले १० हजार रुपये वसूल करण्यासाठी सावकाराने त्याच्या साथीदारामार्फत रिक्षाचालकावर दाबाव आणला. त्याचा मानसिक धक्का बसल्याने रिक्षाचालकाची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी सावकाराच्या साथीदाराला अटक केली आहे.
पूर्वेतील आयरे रोड परिसरात राहणारे मंदार लाड हे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत. एका सावकाराकडून त्यांनी १० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. सोमवारी मध्यरात्री ते रिक्षा चालवून घरी परतत होते. रस्त्यात त्यांनी रिक्षा खंबाळपाडा येथील सीएनजी गॅस पंपावर नेली. तेथे सावकाराचा साथीदार अविनाश चोपळे याने त्यांना रिक्षात गॅस भरण्यास मज्जाव करत पैसे कधी देणार, अशी विचारणा केली. त्यावर माझ्याकडे अत्ता पैसे नाहीत. नंतर देतो, असे मंदार यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याची रिक्षा तिथेच ठवून त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न अविनाशने केला. रिक्षाची चावी अविनाशने त्यांच्याकडून हिसकावून घेतली. तेव्हा मंदार यांनी चावी देत रिक्षा तेथेच ठेवून पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांसह परतला असता रिक्षा आढळली नसल्यचा त्याला धक्का बसला.