बोगस बियाणांनी भातशेतीचे नुकसान
By Admin | Updated: September 12, 2015 23:08 IST2015-09-12T23:08:36+5:302015-09-12T23:08:36+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्योतिका (अंकुर) व इतर कंपन्यांनी तयार केलेली संकरीत भात बियाणे खरेदी केली होती. ही बियाणे बोगस असल्याने भात पिकात गेसल (भेल) निघाली

बोगस बियाणांनी भातशेतीचे नुकसान
वाडा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्योतिका (अंकुर) व इतर कंपन्यांनी तयार केलेली संकरीत भात बियाणे खरेदी केली होती. ही बियाणे बोगस असल्याने भात पिकात गेसल (भेल) निघाली तर काही भात पिकाना रोगांची लागण झाल्याने ही बियाणे बनविणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेवून कृषी अधिकाऱ्यांनी कुडूस, खैरा या गावांना भेटी देवून येथील शेतकऱ्यांच्या भातशेतीची पाहणी केली.
कुडूस येथील शेतकरी इरफान सुसे यांनी या कंपनी विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वाड्याचे पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्याकडे केली आहे.
कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने काल कुडूस येथील तक्रारदार शेतकरी इरफान सुसे, शरद चौधरी व खैरे येथील पुंडलीक देशमुख या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन संपूर्ण भातशेतीची पाहणी केली. यावेळी काही प्रमाणात भेळ, तर जास्त कालावधीच्या भातात लवकर भात आल्याचे दिसले काही ठिकाणी करपा व पाने गुंडाळणारी आळी (बगळ्या) रोगाची लागण झाल्याचे कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
यावर्षी भाताची लागवड करताना भात रोपांचे वय जास्त झाले होते. शिवाय कालावधीच्या अगोदर पिके तयार होत आहेत. भात पिकासाठी आवश्यक असणारा जोराचा पाऊस झालाच नाही व वातावरणातील बदलामुळे भातपीके रोगांची शिकार बनत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. भात पिकांवरील सर्व प्रकारची औषधे पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे उपलब्ध झाली असून शेतकऱ्यांनी ती ५० टक्के अनुदानावर खरेदी करून भातशेती रोगमुक्त करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तालुक्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या भातशेतीत रोगाची लागण झाली आहे अशा भातशेतीची पाहणी कृषी शास्त्रज्ञांकडून केली जाईल असे यावेळी सांगण्यात आले.