पटेल आंदोलनाचा प.रे.ला फटका
By Admin | Updated: August 26, 2015 23:58 IST2015-08-26T23:58:11+5:302015-08-26T23:58:11+5:30
गुजरात राज्यात पटेल समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून जनजीवन विस्कळीत झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्या तीन ते सात तास उशिराने धावत आहेत.

पटेल आंदोलनाचा प.रे.ला फटका
पालघर : गुजरात राज्यात पटेल समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून जनजीवन विस्कळीत झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्या तीन ते सात तास उशिराने धावत आहेत. याचा मोठा फटका पालघर जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसला असून त्यांना बुधवारी झालेल्या परीक्षेला बसता आले नाही. शिवाय, मासे, फळे, फुले, भाजीपाल्याचेही नुकसान होत अनेक चाकरमान्यांना घराकडे वळावे लागले.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, पालघर या तालुक्यांतील नोकरदार, महाविद्यालयीन विद्यार्थी, बागायतदार, मच्छीमार व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने रोज मुंबईकडे जात असतो. परंतु, गुजरात राज्यातील नेते हार्दिक पटेल यांनी पटेल, पाटीदार समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने जाळपोळ होत काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकही आंदोलनकर्त्यांनी उखडले आहेत. या आंदोलनाचा मोठा फटका मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे ट्रेन्स्ला बसला असून पालघर रेल्वे स्टेशनमध्ये पहाटे ३.४५ वाजता येणारी सौराष्ट्र जनता एक्स्प्रेस सकाळी ७.२० वाजता, सकाळी ४ वाजता येणारी लोकशक्ती एक्स्प्रेस ७.५० वा., सकाळी ५ वाजता येणारी सौराष्ट्र मेल दुपारी १२ वाजता तर सकाळी ७.३० वाजता येणारी रणकपूर एक्स्प्रेस १०.३० वाजता आल्या.
मेमू शटल न सोडल्याने प्रवाशांचे हाल
सफाळे येथील अनेक विद्यार्थ्यांचा बुधवारी एफ.वाय.बी.ए.च्या वर्गाचा पॉलिटिकल सायन्स विषयाचा पेपर असल्याने त्यांना पहाटे ४:०८ वा. सुटणारी लोकशक्ती एक्स्प्रेस पकडायची होती. मात्र, ही गाडी तब्बल ३ तास ५० मि. उशिराने आल्याने परीक्षेला मुकावे लागले. तर, भाजीपाला, फळे, दूध, मासे घेऊन मुंबईला जाणाऱ्या व्यावसायिकांना मुंबईमध्ये वेळेवर पोहोचता आले नसल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, प. रेल्वेने डहाणू ते विरारदरम्यान साडेतीन ते साडेपाचदरम्यान एकही जादा लोकल अथवा मेमू शटल न सोडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.