सरपंच हकालपट्टीसाठी पंचायतीला टाळे

By Admin | Updated: March 29, 2016 03:00 IST2016-03-29T03:00:41+5:302016-03-29T03:00:41+5:30

आपल्या पुतणीचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणारे सत्पाळा ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल ठाकूर यांच्या हकालपट्टीसाठी सोमवारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत

The panchayat avoided for the expulsion of Sarpanch | सरपंच हकालपट्टीसाठी पंचायतीला टाळे

सरपंच हकालपट्टीसाठी पंचायतीला टाळे

वसई : आपल्या पुतणीचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणारे सत्पाळा ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल ठाकूर यांच्या हकालपट्टीसाठी सोमवारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.
सत्पाळाचे सरपंच अनिल ठाकूर याने होळीच्या दिवशी आपल्या पुतणीला फुस लावून आणि नोकरीचे आमिष दाखवून पळवून नेले. मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका लॉजवर नेऊन तिच्यावर ठाकूरने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आपल्या काकाकडून असा प्रकार केला जाण्याचा स्वप्नातही न विचार करणाऱ्या या तरुणीने प्रसंगावधान राखून आपली सुटका करून घेतली. आणि पालकांच्या मदतीने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर अनिल ठाकूरवर ३५४ अ अन्वये गुन्हा दाखल होवून,अटकेच्या कारवाईनंतर त्याची जामिनीवर मुक्तताही झाली. गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो पुन्हा रस्त्यावर फिरु लागला. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. गुन्हेगार मुकाट सुटला आणि जिचा विनयभंग झाला ती घरात बसली. तसेच स्वत:च्या पुतणीवर असा प्रसंग करणारा अनिल ठाकूरपासून आपल्या मुलींनाही धोका निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये बळावली. परिणामी ठाकूरची सरपंचपदावरून हकालपट्टी करण्यात यावी. या मागणीसाठी आज ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांनी टाळे ठोकले.
हितेंद्र ठाकूर यांनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी त्यांनी एका निवेदनाद्वारे केली. प्रफुल्ल ठाकूर, सुनिल डिसील्वा, नितीन ठाकूर, हिना पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दरम्यान, पंचायत समितीचे उपसभापती जयप्रकाश ठाकूर आणि माजी सभापती डॉमनिक रुमाव यांनी ग्रामस्थांची भेट घेवून दोन दिवसांत या बाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. सतत चार दिवस ग्रामपंचायतीचे कार्यालय बंद असल्यामुळे ग्रामस्थांची कामे खोळंबली होती. या आंदोलनामुळे पाचव्या दिवशीही त्यांची कामे झाली नाही.या बाबीचा विचार करून ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: The panchayat avoided for the expulsion of Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.