पोटनिवडणुकीबाबत पालघरमध्ये संभ्रम

By Admin | Updated: December 4, 2015 00:45 IST2015-12-04T00:45:07+5:302015-12-04T00:45:07+5:30

पालघर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे रिक्त जागेवर साडेसहा महिन्यांचा कालावधी उलटून जाऊनही आयोगाने निवडणूक जाहीर न केल्याने

Palghar's confusion about by-elections | पोटनिवडणुकीबाबत पालघरमध्ये संभ्रम

पोटनिवडणुकीबाबत पालघरमध्ये संभ्रम

पालघर : पालघर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे रिक्त जागेवर साडेसहा महिन्यांचा कालावधी उलटून जाऊनही आयोगाने निवडणूक जाहीर न केल्याने मतदारांना विकासापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे मूळच्या पालघरच्या पण सांगली येथे राहणाऱ्या एका प्राध्यापकाने तत्काळ निवडणूक लावण्यासंदर्भात पत्र पाठविले होते. परंतु नजीकच्या भविष्यकाळात निवडणुका घोषित केल्या जातील, असे मोघम उत्तर आयोगाने दिल्याने लोकांच्या संभ्रमावस्थेत आणखीन भर पडली आहे.
सांगली येथील (मूळ पालघर) वालचंद इंजिनीअरिंग महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक नारायण मराठे यांनी २१ आॅक्टोबर रोजी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्राला आयोगाने ३० आॅक्टोबरला उत्तर पाठविले असून त्यात निवडणूक नजीकच्या भविष्यकाळात घेण्यात येईल, असे मोघम उत्तर दिले आहे. मराठे यांनी ई-मेलद्वारे आयोगाला पाठविलेल्या पत्रात कृष्णा घोडा यांच्या मृत्यूनंतर आयोगाने तत्काळ रिक्त जागेसाठी निवडणूक जाहीर केली. परंतु, यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने आयोगाने निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती दिली.
प्रा. मराठे यांनी न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याचे तसेच त्यानंतरचा अपिलाचा महिनाभराचा कालावधीही उलटून गेल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच पालघर विधानसभा क्षेत्रामधील विकासकामे खोळंबून राहत असल्याने मतदारांना विकासापासून वंचित राहावे लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने तत्काळ निवडणूक घेण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. प्रा. मराठे यांच्या पत्राला आयोगाने प्रतिसाद देत या रिक्त जागेसाठी निश्चित निवडणूक घेतली जाईल, असे नमूद केले आहे.

Web Title: Palghar's confusion about by-elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.