पालघर तालुक्यातील २१ पेसा गावे घोषित
By Admin | Updated: April 20, 2017 23:57 IST2017-04-20T23:57:20+5:302017-04-20T23:57:20+5:30
जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील प्रस्तावित गावांपैकी २१ गावे पेसा गावे घोषित करण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी याबाबतची घोषणा केली आहे

पालघर तालुक्यातील २१ पेसा गावे घोषित
पालघर/नंडोरे : जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील प्रस्तावित गावांपैकी २१ गावे पेसा गावे घोषित करण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे या गावांना आता आर्थिक स्वायत्तता मोठ्या प्रमाणावर प्राप्त होणार आहे.
या गावांमध्ये बेटेगाव ग्रामपंचायतीतले आंबागांव, बोरशेती ग्रां.प.तील अलनशेती व वनशेती, चहाडे ग्रां.पं. तील कासपाडा, लहांगेपाडा व आनंदगाव, दिहसर तर्फे तारापूर मधील भेंडवल व जांभळे, गिरनोलीतील खुताडपाडा व वळवीपाडा, गुदले तील पांजरा, घिवली तील टोकपाडा, कमारेतील आंबेगाव, काटाळेतील कोल्हेमानपाडा, कोकणेरमधील राईगाव, कोंढणमधील डोंगरमाळ, मान ग्रां .पं तील नूतनगाव, संघमेव व पालेगाव रावते ग्रां .पं तील नांदगाव, सागावेतील ब्राह्मणपाडा तर उनभाट ग्रामपंचायतीतील चिरेपाडा यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील आदिवासी विकासाला चालना मिळावी तसेच त्यांची स्वशासन व्यवस्था बळकट होण्यासाठी पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. पेसा कायद्याचे अधिकार प्राप्त झालेल्या या गावांना आता स्वतंत्र ग्रामसभा घेणे शक्य होणास असून स्वत:चा ग्रामसभा कोष, गावांतर्गत लघु पाणी साठ्याचे नियोजन, गावातील गौण खनिजाचे नियोजन, गावातील अनुसूचित जमातीच्या अतिक्रमण झालेल्या जमिनी परत मिळवून देणे या सारखे अधिकार थेट या गावांना या अंतर्गत मिळालेले आहेत. या निर्णयामुळे या गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचा विकासही जलद होणार आहे. (वार्ताहर)