आरोग्य सेवेत पालघर प्रथम
By Admin | Updated: January 6, 2016 01:01 IST2016-01-06T01:01:06+5:302016-01-06T01:01:06+5:30
पालघर जिल्ह्यातील एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी ३५ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या करण्यात आलेल्या कायापालटानंतर कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत रूग्णालयात प्रसूतींचे वाढलेले प्रमाण

आरोग्य सेवेत पालघर प्रथम
हितेन नाईक, पालघर
पालघर जिल्ह्यातील एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी ३५ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या करण्यात आलेल्या कायापालटानंतर कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत रूग्णालयात प्रसूतींचे वाढलेले प्रमाण, माता व बालमृत्यूचे घटलेले प्रमाण इ. सह आरोग्यसेवा पुरविण्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या ४८ निकषांचे उत्कृष्ट पालन करून पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अन्य तीन जिल्ह्यासह राज्यात संयुक्त प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
नवनिर्मित पालघर जिल्ह्याची १ आॅगस्ट २०१४ रोजी स्थापना करण्यात आल्यानंतर १ सप्टेंबरला जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाची सुरूवात झाली. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यामध्ये ९ ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३०४ उपकेंद्रे, ३१ वैद्यकीय मदत पथके, १८ प्राथमिक आरोग्य पथके तर ८ जिल्हापरिषदेचे दवाखाने आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा पुरविली जाते. यामध्ये कुटुंब कल्याण कार्यक्रमातंर्गत शस्त्रक्रिया, तांबी बसवणे, दोन अपत्यांवर शस्त्रक्रिया, जननी सुरक्षा योजनांची अंमलबजावणी, मातामृत्यू व बालमृत्यू प्रमाणात झालेली घट इ. बाबत अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ. संतोष गायकवाड व त्यांच्या टीमने पूर्ण जिल्ह्यात केली होती.