नायगाव खाडीपुलाच्या कामाला आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:36 IST2019-11-17T22:36:46+5:302019-11-17T22:36:49+5:30
पाऊस थांबल्याने कामाला सुरुवात; जानेवारी २०२० मध्ये पूल खुला होणार?

नायगाव खाडीपुलाच्या कामाला आला वेग
वसई : वसई तालुक्यातील नायगाव पूर्वेकडील सोपारा खाडीवरील नवीन पादचारी पुलाच्या उतार मार्गाचे रखडलेले काम लवकरच पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. पाऊस थांबल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने आता हे काम पुन्हा एकदा सुरू केले आहे. तब्बल पाच वर्षे हे काम रखडले आहे. त्यामुळे येथील स्थानिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हे काम पुन्हा सुरू झाले आहे.
या नायगाव पुलाचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा बांधकाम विभागाचा मानस असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी २०२० मध्ये हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याचा दावाच सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.
अधिक माहितीनुसार, नायगाव पूर्वेला सोपारा खाडी असून येथील सर्वच नागरिक नायगाव स्टेशनवर जाण्यासाठी या सोपारा खाडीवरील जुन्या लोखंडी पत्री पुलाचा वापर करतात. मात्र हा पूल अतिशय धोकादायक असल्याने नायगाव पूर्वेकडील भागात नागरिकांना ये-जा करण्यासाठी नवीन पादचारी पूल तयार करण्यात येत आहे. येथून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी जातात. मात्र, हा पूलही अर्धवट अवस्थेतच नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. या नवीन पुलाच्या उतार मार्गाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने पूर्वेस राहणाऱ्या नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतल्याचे चित्र आहे. काम वेळेत पूर्ण झाल्यास नागरिकांचा त्रास निश्चितच वाचणार आहे.
४ वर्षात ४ वेळा टेंडर
२०१४ ते २०१८ या चार वर्षांच्या काळात या नायगाव पुलासाठी एकूण चार वेळा निविदा (टेंडर) काढण्यात आली. तर या पुलाच्या कामासाठी सा.बां. विभागाकडून ५ कोटी २० लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला होता. तर अतिरिक्त खर्चाचा भार वसई - विरार महानगरपालिकेने घेतला. पुलाच्या कामासाठी अतिरिक्त खर्च येत असल्याने वसई - विरार मनपाने देखील मदतीचा हात पुढे केला आणि यासाठी पीडब्ल्यूडी विभागाला १ कोटी १ लाख ७४ हजार इतका निधी मंजूर केला.
ढिसाळ कारभारामुळे पूल ३ वर्षे रखडला
२०१४ मध्ये नवीन पुलाच्या कामाची निविदा काढून त्याला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर हे काम २०१६ मध्ये पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराच्या ढिसाळ कारभारामुळे या पुलाचे काम तीन वर्षे उलटूनही पूर्ण होऊ शकलेले नाही.