Overcoming the obstacle in the way of the cemetery | दफनभूमीच्या मार्गातील अडथळा दूर

दफनभूमीच्या मार्गातील अडथळा दूर

वसई : सात ते आठ वर्षांपासून कायद्याच्या कचाट्यात सापडून रखडपट्टी झालेल्या वसईच्या दिवाणमान येथील सनसिटी येथील सर्वधर्मीय दफनभूमी विकसित करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासाठी महाराष्ट्र सागरी व्यवस्थापन प्राधिकरणानंतर पाणथळ जागेच्या नियमांनुसारही परवानगी मिळाली आहे.

वसई-विरार शहर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर साधारण पहिल्याच टर्ममध्ये प्रथम महापालिका प्रशासनाने सरकारी जागा पालिकेच्या ताब्यात देण्याबाबत आग्रह धरला. त्यानुसार, तिथे सर्वधर्मीयांसाठी दफनभूमी तयार करण्याची योजना तयार केली आणि त्याचा पाठपुरावाही सुरू केला.
सर्वप्रथम त्यासाठी वसईच्या सनसिटी येथे ११ एकर जागा आरक्षित केली. राज्य शासनाकडून २०११ मध्ये ही जागा महापालिकेच्या ताब्यात आली होती. पालिकेने ठराव करत २०१२-१३ मध्ये या जागेवर मातीभराव करून संरक्षक भिंत बांधली. मात्र, नागरी वसाहत असल्याने या प्रस्तावित दफनभूमीला स्थानिक नागरिक आणि काही राजकीय पक्ष व संघटनांनी विरोध केला होता.

खाजण जागेवर पालिकेने केलेले दफनभूमीचे बांधकाम हे सागरी किनारा नियंत्रण क्षेत्राचे उल्लंघन करणारे असल्याचा गंभीर आरोप करून तेव्हा शिवसेनेच्या सुनील मुळये यांनी पुणे येथील हरित लवादाकडे तक्रार केली. यानंतर हरित लवादाने या जागेवरील संरक्षक भिंतीचे बांधकाम थांबवून भिंत पाडण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून आजपर्यंत या दफनभूमीचे काम रखडले होते. मात्र आता संबंधित विभागांची परवानगी मिळाल्यामुळे दफनभूमीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. दफनभूमीच्या कामासाठी ज्या परवानग्या आवश्यक होत्या, त्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, अशी माहिती पालिकेचे नगररचना विभागाचे संचालक वाय.एस. रेड्डी यांनी ‘लोकमत’ला दिली.

वसईतील दिवाणमान सनसिटी येथील दफनभूमीच्या कामासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. यापुढे दफनभूमी बांधण्याचे व ती विकसित करण्याचे काम हा प्रशासकीय निर्णय आहे. विशेष प्रशासकीय स्तरावर हे काम पुढे नेले जाईल.
- वाय.एस. रेड्डी, संचालक,
नगररचना विभाग, वसई-विरार महापालिका

Web Title: Overcoming the obstacle in the way of the cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.