पोेलीस, महापालिकेविरोधात आदिवासींचा मोर्चा

By Admin | Updated: February 4, 2017 02:49 IST2017-02-04T02:49:25+5:302017-02-04T02:49:25+5:30

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात यावी आणि पालिका कर्मचाऱ्याने केलेले अनधिकृत बांधकाम तात्काळ दुर करण्यात यावे

Opposition's front against poles, municipal corporation | पोेलीस, महापालिकेविरोधात आदिवासींचा मोर्चा

पोेलीस, महापालिकेविरोधात आदिवासींचा मोर्चा

वसई : खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात यावी आणि पालिका कर्मचाऱ्याने केलेले अनधिकृत बांधकाम तात्काळ दुर करण्यात यावे, या मागणीसाठी आदिवासी एकता परिषदेने प्रचंड मोर्चा काढला होता.
नालासोपारा पश्चिमेकडील गास-ब्रम्हा डोंगरी येथे महापालिकेतील कर्मचारी अशोक केशव बोस आणि केशव जीवा बोस यांनी अनधिकृत शेड उभारली आहे. या शेडमुळे शेजारी राहणाऱ्या चिमणी गोविंद झिंबल यांना नाहक विविध त्रासाल सामोरे जावे लागत आहे. या शेडवरून चिमणीबार्इंच्या घरात उंदीर शिरुन अन्नधान्य आणि कपड्यांची नासधुस करतात. तसेच या उंदराच्या मागे विषारी सापही घरात शिरत असल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ही अनधिकृत शेड तात्काळ दुर करण्यात यावी,अशी मागणी आदिवासी एकता परिषदेने महापालिकेकडे केली होती. मात्र, ही शेड उभारणारा अशोक बोस हा पालिका कर्मचारी असल्यामुळे त्याला पाठीशी घालण्याचे काम सहाय्यक आयुक्त प्रकाश जाधव यांनी केले. त्यामुळे संतप्त झालेल्या आदिवासी बांधवांनी मोर्चाचा इशारा दिला होता.
त्यावर तोडगा काढण्यासाठी नालासोपारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रवींद्र बडगुजर यांनी सहाय्यक आयुक्त जाधव आणि आदिवासी एकता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.परिषदेचे अध्यक्ष दत्ता सांबरे, उपाध्यक्ष वंदना जाधव,सचिव प्रकाश जाधव यांच्यासह दहा-पंधरा कार्यकर्ते या बैठकिला उपस्थित होते. या बैठकित तोडगा काढण्याऐवजी बडगुजर यांनी आम्हालाच धमकी दिली.जास्त बोललात तर गुन्हा दाखल करून तुम्हाला आत टाकू,पोलीसांशी अरेरावी केली असा गुन्हा दाखल करून तुम्हाला अतिरेकी ठरवु.अशी धमकी बडगुजर यांनी आम्हाला दिली.असे एकता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बडगुजर यांच्या धमकीमुळे मोर्चा काढण्याची इच्छा अधिक तीव्र करून आज आम्ही मोर्चा काढला.
महापालिका कर्मचाऱ्याचे अतिक्रमण, त्याला पाठीशी घालणारे सहाय्यक आयुक्त प्रकाश जाधव आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणारे बडगुजर यांना तात्काळ दूर करावे,अशी मागणी या मोर्च्याद्वारे करण्यात आली. सुमारे सहाशे-सातशे आदिवासी बांधव या मोर्च्यात सहभागी झाले होते. त्यात महिलांचा सहभाग जास्त होता. दरम्यान, वरील अतिक्रमण उद्या काढण्यात येईल.असे लेखी आश्वासन महापालिकेने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Opposition's front against poles, municipal corporation