वाढवणला सेनेचा विरोध
By Admin | Updated: August 18, 2015 00:26 IST2015-08-18T00:26:24+5:302015-08-18T00:26:24+5:30
जिल्ह्यातील नांदगाव येथे जिंदाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने प्रस्तावित जेटी तयार करण्याचे ठरविले असून या जिंदाल जेटीमुळे येथील स्थानिक मच्छीमार बांधवांचा

वाढवणला सेनेचा विरोध
पालघर : जिल्ह्यातील नांदगाव येथे जिंदाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने प्रस्तावित जेटी तयार करण्याचे ठरविले असून या जिंदाल जेटीमुळे येथील स्थानिक मच्छीमार बांधवांचा मासेमारीचा व्यवसाय उद्ध्वस्त होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिंदाल जेटी आणि वाढवण बंदर कोणत्याही परिस्थितीत शिवसेना होऊ देणार नाही, असा ुइशारा शिवसेना उपनेते व पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे यांनी येथे दिला. जिंदाल जेटीची पाहणी करण्याकरिता ते येथे आले होते.
ते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नांदगाव येथील मच्छीमारांचे शिष्टमंडळ भेटले असता त्यांनी मला नांदगाव येथे जाऊन जिंदाल जेटीची पाहणी करण्यास सांगितले. पालघर किनारपट्टीवरील कोळी, आगरी, भंडारी, कुणबी, आदिवासी अशा बहुसंख्य बांधवांचा उदरनिर्वाह मासेमारीवर चालतो. पालघरची किनारपट्टी ही मासेमारीचा उत्तम झोन आहे. जिंदाल जेटीमुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात येऊ शकतो. तसेच मासेमारीबरोबर किनारपट्टीवर असलेली भातशेती, नारळ, ताडाची बागायती, निसर्गाचे अतिशय नयनरम्य सौंदर्यसुद्धा नष्ट होणार आहे. शिवसेना कायम स्थानिक बांधवांच्या पाठीशी उभी राहिली आहे. तशीच आज व यापुढेदेखील उभी राहील. युतीचे सरकार असतांनाही शिवसेनेने वाढवण बंदराला १९९८ साली जसा प्रखर विरोध केला, तसाच विरोध जिंदाल जेटी व वाढवण बंदराला राहील. स्थानिकांना उद्ध्वस्त करणारे कोणते प्रकल्प येत असतील तर शिवसेना ते कदापि होऊ देणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.
नांदगाव येथे जेटीची पाहणी करताना पालघर सहसंपर्कप्रमुख केतन पाटील, पालघर उपजिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, तालुकाप्रमुख सुधीर तामोरे, पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सचिन पाटील, नीलम संखे, शिवसेना पदाधिकारी जगदीश धोडी, नांदगाव येथील विभागप्रमुख निलेश पाटील, धर्मंेद्र पाटील, राजू वाडकर, जगदीश ठाकूर, विशाल पाटील, मनीषा पिंपळे, जितेंद्र मेहेर, कल्पेश पिंपळे आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)