उघडे ट्रान्सफार्मर, लोंबणाऱ्या तारा ठरताहेत जीवघेण्या
By Admin | Updated: May 11, 2017 01:38 IST2017-05-11T01:38:52+5:302017-05-11T01:38:52+5:30
डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात लोंबणाऱ्या वीज वाहक तारा व उघडे ट्रान्सफॉर्मर जीवघेणे ठरत असतांनाही महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

उघडे ट्रान्सफार्मर, लोंबणाऱ्या तारा ठरताहेत जीवघेण्या
शशिकांत ठाकूर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कासा : डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात लोंबणाऱ्या वीज वाहक तारा व उघडे ट्रान्सफॉर्मर जीवघेणे ठरत असतांनाही महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्याच्या काळातील सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही खेड्यातील वीजपुरवठा खंडीत होण्याचीही शक्यता आहे.
तालुक्यातील खेड्यापाड्यातील विजेचे खांब, तारा बदलणे आदी कामे २५ वर्षांपासून केलेली नाहीत. त्यामुळे संपूर्ण वीज यंत्रणाच जीर्ण झाली आहे. जमिनीत रोवलेल्या खांबाचा पाया गंजल्याने ते वाकडे झाले आहेत. काही ठिकाणी ग्रामस्थांनी आधार देऊन बांधून ठेवले आहेत. त्यामुळे वीजवाहक तारा जमिनीकडे लोंबकळू लागल्या आहेत. तसेच वेळोवेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून झाडांचे ट्रीमिंग केले जात नसल्याने वीजवाहक तारांवर तसेच खांबावर वेली, चढल्या आहेत तर झाडांच्या फांद्या तारांत घुसल्या आहेत. तसेच बऱ्याच ठिकाणी ट्रान्सफार्मर उघडे आहेत.
तालुक्यातील पेठ, धामटणे, म्हसाड, सारणी, साये, घोळ, आंबेदा, मुरबाड आदी ठिकाणी ट्रान्सफार्मर उघडे आहेत त्यामुळे अपघाताचा धोका आहे. मुळात मनुष्यबळ कमी असल्याने या यंत्रणेत काही बिघाड झाला तर तो दुरुस्त करण्यास खूप वेळ जातो. त्याकडेही लक्ष द्यायला हवे.