खासदारांच्या हस्ते लोकार्पण केलेल्या खुल्या व्यायामशाळेची झाली दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 05:32 IST2018-11-15T05:31:09+5:302018-11-15T05:32:02+5:30
१५ दिवसांपूर्वीच झाले उद्घाटन : अर्नाळा ग्रामपंचायतीने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप

खासदारांच्या हस्ते लोकार्पण केलेल्या खुल्या व्यायामशाळेची झाली दुरवस्था
वसई : अर्नाळा ग्रामपंचायतीने नुकताच मोठा गाजावाजा करत अर्नाळा समूद्रकिना-यावर खुल्या व्यायामशाळेचे उद्घाटन खासदार राजेंद्र गावीत यांच्या हस्ते केले होते. मात्र, अवघ्या १५ दिवसात तिची दुरावस्था झाल्याने, या कामासाठी निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरले गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
अर्नाळा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध उपक्र म राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोकण पर्यटन विकास कार्यक्र म, निर्मल सागर तट अभियान, ठक्करबाप्पा योजना अंतर्गत विविध विकासकामांचा पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावीत यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण सोहळा २६ नोव्हेंबर रोजी अर्नाळा सुरूची बाग येथे करण्यात आले होते. यात नियोजित उपक्र मात कोकण पर्यटन विकास कार्यक्र म अंतर्गत खुला रंगमंच बांधणे, पर्यटकांसाठी वाहनतळ पेव्हर ब्लॉक लावणे, समुद्रकिनाऱ्यावर जाणारा रस्ता काँक्रि टीकरण करणे तसेच निर्मल सागरतट अभियानांतर्गत खूल्या व्यायामशाळेचे लोकापर्ण व ठक्करबाप्पा योजनेंतर्गत फॅक्टरीपाडा रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे आदी कामांचा समावेश होता. याचे भुमीपूजन व लोकार्पण होऊन अवघे पंधरा दिवसही उलटले नसताना खूल्या व्यायामशाळेसाठी लावण्यात आलेल्या व्यायामाच्या सामानाची मोडतोड झालेली पहायला मिळत आहे. निकृष्ठ दर्जाचे पाईप व तकलादू सामान यासाठी वापरले गेल्यामूळे जागोजागी वेल्डींग उखडले गेले आहेत. लहान मूलांना बसण्याच्या खुर्चाही तुटून खाली पडलेल्या पहायला मिळत आहेत. यामुळे दुर्घटना घडू शकते. अवघ्या पंधरा दिवसात अशी दुरावस्था झाल्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत असून याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
यासाठी २ लाख ३० हजार रूपये प्ले ग्लोबल या कंपनीला देण्यात आले होते. मात्र हे सामान ज्या जागेत बसविण्यात येणार होते, त्या जागेबद्दल वनविभागाची परवानगी मिळत नव्हती म्हणून हा खूल्या व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा रखडला होता असे सांगण्यात आले.
याबाबत संबंधीत कंपनीविरोधात निकृष्ठ दर्जाचे सामान वापरून दिशाभूल केल्याबद्दल अर्नाळा ग्रामपंचायतीकडून काय कारवाई करण्यात येणार आहे याबद्दल माहिती मिळू शकली नाही. मात्र, कंपनीने काम उत्तम असल्याचे सांगितले.
प्ले ग्लोबलचा दर्जा उत्तम
याबाबत उपसरपंच महेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, खूल्या व्यायामशाळेसाठी सातीवली येथील नामांकित प्ले ग्लोबल या कंपनीचे मालक अगरवाल यांच्या कडून हे सामान बनवून घेतले असल्याचे सांगितले. जास्त वजन दिल्यामुळे यातील काही भागाची मोडतोड झाली असल्याचे त्यांनी सांगत, निकृष्ठ दर्जाचे सामान वापरले गेल्याचा इन्कार केला. अर्नाळा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पंकज संख्ये टेंडर मागविल्यानंतर कंपनीकडून हे सामान मार्च २०१८ ला मागविल्याचे सांगितले.