आॅनलाइन यंत्रणा फेल, दाखल्यासाठी महिना
By Admin | Updated: May 12, 2017 01:23 IST2017-05-12T01:23:31+5:302017-05-12T01:23:31+5:30
डहाणू महसूल विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे दाखल्यांसाठी वणवण फिरण्याची वेळ नागरिकांवर ओढवली आहे. दाखल्यासाठी

आॅनलाइन यंत्रणा फेल, दाखल्यासाठी महिना
लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : डहाणू महसूल विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे दाखल्यांसाठी वणवण फिरण्याची वेळ नागरिकांवर ओढवली आहे. दाखल्यासाठी महिनाभर प्रतिक्षा करण्याचा सल्ला कर्मचाऱ्यांकडून दिला जात असल्याने एका क्लिकवर आॅनलाइन दाखले देण्याची या विभागाची यंत्रणा व कार्यपद्धती फोल ठरल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
आगामी वर्षातील पाल्याच्या शैक्षणिक प्रवेशाकरिता आवश्यक दाखले मिळविण्यासाठी पालकवर्ग कामाला लागला आहे. उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, डोमेसाईल अशा विविध दाखल्यांकरिता अर्जसोबत जोडावयाच्या कागदपत्रांची जमवाजमव केल्यानंतर संबंधित गावच्या तलाठ्यांची भेट घेण्यात वेळ आणि पैसा खर्ची घालावा लागत आहे. मात्र काही तलाठी कार्यालयाकडे फिरकत नसल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. दरम्यान मोठ्या मुश्किलीने तलाठ्याकडून सही- शिक्का मिळवल्यानंतर सुद्धा सेतु कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून अर्ज घेण्यास टाळाटाळ केली जाते. शिवाय महा-ई सेवा केंद्राकडे जाण्याचा सल्ला दिला जातो.
सेतू कार्यालय हा महसूल प्रशासनाचा विभाग असून येथे विविध दाखल्याकरिता आलेले अर्ज स्वीकारून दाखला निर्धारीत दिवसात देणे आवश्यक आहे. महा-ईसेवा केंद्रात अर्ज केल्यास त्याकरीता जादा पैसे आणि दुप्पट दिवस खर्च होतात. शिवाय डिजिटल सहीची प्रक्रियाही अडथळा ठरते आहे.