एकदरामधील स्वाईन फ्लू नियंत्रणात
By Admin | Updated: May 4, 2015 01:06 IST2015-05-03T22:51:36+5:302015-05-04T01:06:40+5:30
गेल्या काही दिवसांपासून मुरुड तालुक्यातील एकदरा गावात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले होते. यामध्ये स्वाइन फ्लूची लागण झालेल्या दोन रुग्णांना

एकदरामधील स्वाईन फ्लू नियंत्रणात
बोर्ली-मांडला : गेल्या काही दिवसांपासून मुरुड तालुक्यातील एकदरा गावात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले होते. यामध्ये स्वाइन फ्लूची लागण झालेल्या दोन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला तर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात योग्य उपचार झाल्याने चार रुग्ण पूर्ण बरे झाले आहे. मुरुड तालुका आरोग्य विभाग आणि आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत अभियान राबवून एकदरा गावातील स्वाइन फ्लूची साथ आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले असून कोणीही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत जगताप यांनी केले आहे.
एकदरा गावामध्ये मागील काही दिवसांपासून स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण आढळून आले. तत्पूर्वी गावामध्ये श्रीराम नवमी यात्रेनिमित्त गावातील ग्रामस्थ नोकरी व्यवसायानिमित्त परगावी राहत आहेत. ती मंडळी गावात आली होती यावेळी गावामध्ये स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण होता. गावातील एकाच कुटुंबातील चार जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. मात्र वेळीच त्याच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात योग्य उपचार मिळाल्यामुळे त्यांना जीवदान मिळाले.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने व आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांनी परिश्रम घेवून स्वाइन फ्लूवर अभियान राबवून जनजागृती केल्यामुळे रोगावर नियंत्रण मिळाले. तरी प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी सर्दी, पडसे, दम लागणे, घसा दुखणे अगर ताप येण्यासारखी लक्षणे दिसू लागताच नजीकच्या ग्रामीण रुग्णालय तथा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचार घेवून वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. स्वाइन फ्लूचा आजार टाळण्यासाठी सर्दी खोकला येणाऱ्या रुग्णांपासून सहा फूट दूर रहावे. (वार्ताहर)