जुना अंबाडी उड्डाणपूल लवकरच खुला होणार; नागरिकांना पालिकेचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 23:09 IST2020-01-12T23:09:40+5:302020-01-12T23:09:58+5:30
उपमहापौरांनी केली पुलाची पाहणी

जुना अंबाडी उड्डाणपूल लवकरच खुला होणार; नागरिकांना पालिकेचा दिलासा
वसई : वसई पूर्व - पश्चिमेला जोडणारा पूल कित्येक महिने दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्याने वसईकर नागरिकांना प्रचंड वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. तर दुसरीकडे दीड वर्षे दुरुस्तीसाठी बंद असलेला हा उड्डाणपूल लवकरात लवकर सुरू करण्यात यावा यासाठी नागरिकांनी आ. हितेंद्र ठाकूर यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर याबाबत तातडीने कार्यवाही करत माजी महापौर नारायण मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी वसईच्या या अंबाडी पूर्व - पश्चिम उड्डाणपुलाची पाहणी करण्यात आली. या प्रसंगी वसई - विरार मनपाचे उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्स, सभागृह नेते फ्रँक आपटे, सभापती उमा पाटील, राजू कांबळी, भरत गुप्ता, संदेश जाधव, नितीन राऊत, नगरसेवक कल्पेश मानकर, सचिन घरत आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, या उड्डाणपुलाची पाहणी केल्यावर हा पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला व्हावा, यासाठी कोणत्या उपाययोजना त्वरित करता येतील यावर चर्चा झाली. चर्चेअंती या जंबो शिष्टमंडळाने दिलेल्या महत्त्वाच्या सूचना रेल्वे आणि महापालिका प्रशासनाला त्वरित देण्यात येणार असून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करावा असे निर्देश यावेळी महापालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांच्यासह नवघर ‘एच’ प्रभाग समितीचे सहा. आयुक्त ग्लसिन गोन्साल्विस यांना दिल्या आहेत.
अर्थातच हा बंद उड्डाणपूल सुरू झाल्यास पूर्व - पश्चिम भागातील नागरिक, वाहनचालकांची मोठ्या वाहतूककोंडीतून सुटका होईल आणि खास करून नवीन पुलावरून सुरू असलेली दुतर्फा वाहतूकही थांबेल.
हा जुना अंबाडी उड्डाणपूल दुरूस्त झाला असून लवकरात लवकर हा पूल रहदारीसाठी खुला करण्यात यावा यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा केला असून त्याला हिरवा कंदील मिळाला आहे. काही दिवसांतच हा पूल सुरु होईल, असेही पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.