पालघर : जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर पालिका, नगरपंचायती क्षेत्रअंतर्गत आणि बोईसर क्षेत्रातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, शैक्षणिक संस्था तसेच चित्रपटगृहे, नाट्यगृहे तरण तलाव, जिम, मॉल्स हे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश रविवारी जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केले. जिल्ह्यातील कोरोनाची लक्षणे आढळलेल्या ९ पैकी ४ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ५ रुग्णांचे रिपोर्ट उद्या येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकही रुग्ण बाधित नसल्याचे सांगून नागरिकांनी गर्दी टाळण्याचे आवाहन केले.कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील महानगरपालिका सर्व नगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सरकारी व खाजगी शाळा, अंगणवाडी आणि महाविद्यालये व व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जाहीर केले. यात्रा, जत्रा, दिंडी, पदयात्रा, कीर्तन, भंडारा, सार्वजनिक सप्ताहात नागरिकांची गर्दी जमेल असे कार्यक्रम साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सामाजिक सांस्कृतिक राजकीय धार्मिक क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत परवानगी देण्यात येणार नाही, अशा कार्यक्रमांना यापूर्वी परवानगी दिली असल्यास सदर परवानगी रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होणारे कौटुंबिक खाजगी कार्यक्रम, लग्न समारंभ जिल्ह्यातील जनतेने आपली सामाजिक जबाबदारी समजून पुढे ढकलावे असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
जिल्ह्यात एकही रुग्ण ‘कोरोना’बाधित नाही, चार जण निगेटिव्ह, पाच रिपोर्ट आज मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 01:05 IST