लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका नायजेरियन आरोपीला तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून २ करोड ८ लाख रुपयांचे १ किलो ४० ग्रॅम मेफेड्रोन अंमली पदार्थ जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रगती नगरच्या जगन्नाथ अपार्टमेंटच्या रूम नंबर २०६ मध्ये एक नायजेरियनकडे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असल्याची माहिती तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. सदरबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून कारवाई करणेबाबत आदेश प्राप्त केला. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावुन रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास धाड मारली.
नायजेरियन आरोपी चीमा मॉसेस गॉडसन चीमा (४०) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर वेगवेगळ्या प्लास्टिक थैलीमध्ये २ करोड ८ लाख रूपये किंमतीचे १ किलो ४० ग्रॅम वजनाचे पांढऱ्या रंगाचे बारीक खडे असलेले मेफेड्रोन अंमली पदार्थ मिळून आले आहे. तसेच रोख रक्कम, पिशव्या, इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण २ करोड ८ लाख ३४ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तुळींज पोलिसांनी एनडीपीएस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. जप्त मुद्देमाल कोठुन खरेदी केला याबाबत आरोपीकडे चौकशी करत आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील, तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदारांनी केली आहे.